मामा लग्नाला आला अन् पन्नास व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपर्यंत (ता.३१) संचारबंदी आहे. आष्टी तालुक्यातील कारखेलपासून जवळच असलेल्या बर्डे वस्ती येथे आजीनाथ बर्डे यांनी त्यांच्या मुलीचे लग्न बर्डे वस्ती येथे सोमवारी (२९ जून) आयोजित केले होते.

कडा (जि. बीड) - संपूर्ण राज्यात 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत असताना आष्टी तालुक्यातील कारखेल येथील बर्डेवस्तीवर सोमवारी (२९ जून) शासनाची परवानगी न घेता लग्न लावले. नवरीचा मामा होम क्वारंटाइन असतानासुद्धा लग्नाला आला. त्यामुळे या प्रकरणात पन्नास व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपर्यंत (ता.३१) संचारबंदी आहे. आष्टी तालुक्यातील कारखेलपासून जवळच असलेल्या बर्डे वस्ती येथे आजीनाथ बर्डे यांनी त्यांच्या मुलीचे लग्न बर्डे वस्ती येथे सोमवारी (२९ जून) आयोजित केले होते. या लग्नाला नवरीचे मामा बापू लांडगे हे होम क्वारंटाइन असतानाही लग्नाला मुंबई येथून येऊन हजर राहिले. विशेष म्हणजे हा मामा नंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून, त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. विनापरवाना लग्न आयोजित करू नये अशी नोटीस दिली असतानाही बर्डे यांनी सोमवारी थाटात लग्न लावले. या लग्नाला पन्नासपेक्षा जास्त व्यक्ती हजर होते.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात शेतकऱ्याने घेतली फाशी

सदरील लग्नाची माहिती ग्रामसेवक अशोक खकाळ यांना समजताच त्यांनी शनिवारी (ता.चार) अंभोरा पोलिसात नवरीची आई, वडील, मामा, फोटोग्राफर यांच्यासह पन्नास वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे याच लग्नाला हजर असलेला मुलीचा मामा बापू लांडगे याच्यावर होम क्वारंटाइन असतानासुद्धा बाहेरगावी फिरल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या लग्नाला उपस्थित असणाऱ्यांचा शोध अंभोरा पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखंडे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty people were charged in beed district