
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे . सध्या शहरात वाढीव पोलिस बंदोबस्त असून पोलिसांची गस्तही सुरु आहे
हिंगोली : शहरातील रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरा मशीन भागात जून्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता . २७) रात्री घडली. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून ४१ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या शहरात वाढीव पोलिस बंदोबस्त असून पोलिसांची गस्तही सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशांत पिल्ले व शेख इस्माईल यांच्यात मागील काही दिवसांत वाद सुरु होता. शुक्रवारी वाद वाढल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. त्यानंतर काही वेळातच मारामारी सुरु झाली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
हेही वाचा - नांदेड : पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा -
याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यतिन देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सय्यद अखील, उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, नितीन केणेकर, शेख शकील, गजानन होळकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावर दंगा नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले होते. या प्रकरणी प्रशांत पिल्ले यांच्या तक्रारीवरून शेख माजीद, आवेज खान, शेख जावेद, शेख अमीर, शेख अमजद, जुबेरखाँ पठाण, अकबर लोहार, शेख अनिस, असीफ पठाण, मुफ्ती फईम, शेख जायद व अन्य १५ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे.
याच प्रकरणात शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत पिल्ले, भुषण पिल्ले, संदीप पिल्ले, प्रदीप पिल्ले व इतर दहा जणांवर वाहनाची तोडफोड करून नुकसान केले तसेच मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली या कारणावरून गुन्हा दाखल झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गस्त वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी शहरात भेट देऊन पाहणी केली व आवश्यक सुचना दिल्या.
संपादन - प्रल्हाद कांबळे