परंपरा कायम ठेवणे आमदाराला भोवले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

रमजान ईदच्या अनेक वर्षांपासूनच्या सामुदायिक नमाज अदा करण्याची परंपरा ही कायम राहावी व कोरोना महामारीत सुरक्षित अंतराचेही पालन व्हावे, या दृष्टीने आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर आखलेल्या योजनेनुसार शहरातील मोजक्या मुस्लिम बांधवांनीसह सोमवारी (ता.२५) ईदची नमाज अदा केली. दरम्यान, या वेळी कोरोना महामारीपासून रक्षण करण्याची प्रार्थना करण्यात आली. परंतू, जिल्ह्यात जमावबंदीचे आदेशही असताना आमदार दुर्राणी यांनी १०० ते १२५ लोक एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतरांवर पाथरी पोलिसा गुन्हा दाखल झाला आहे.

पाथरी (जि. परभणी) : कोरोना विषाणू संसर्गामुळे जमावबंदीचे आदेश असतांनाही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केल्याप्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह इतरावर पाथरी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संसर्ग राज्यात वाढत आहे. अशा परिस्थितीत ता. २३ मार्चपासून टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जमावबंदीचे आदेशही दिले आहेत. सोमवारी (ता. २५) जिल्हाभरात रमजान ईद साजरी करण्यात आली. ईद साजरी करतांना जिल्ह्यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी नमाज आदा करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले होते. परंतु, पाथरी येथे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या समर्थकांसह सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण केले.

हेही वाचा व पहा : Video : सायरन वाजवून पोलिसांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा....

पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हे
यामुळे त्यांच्यासह तबरेज खान रहेमान खान दुर्राणी, तारेख खान आब्दुला खान दुर्राणी, हरून मौलाना सारोलवी, शेख जमील, शेख रशीद, छड्या अब्दुल रजक, शेख मतीन कपडेवाला, मुस्तफा टेलर, शेख खय्यूम खेश नत्रू, अजहर शेख, फेरोज खान, रज्जाक सय्यद, शमीम भाई, सलीम सय्यद, पाशाभाई फैजू, मोईज अन्सारी यांच्यासह इतर १०० ते १२५ लोक एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी जमले. यामुळे त्यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा : ‘ऐ खुदा... बिमारी और वबासे हर इन्सान की हिफाजत फरमा’...!

नागरिकांनी खबरदारी घ्यावी
राज्यात आलेल्या कोरोना विषाणूचे संकट टाळण्यासाठी व त्याचा प्रसार होऊ नये ही जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, एकत्र जमू नये. सर्व धर्म गुरूंना, सर्व धार्मिक स्थळांना मंदिरे, मश्जिद, बौद्ध विहार, गुरुद्वारा, चर्च आदी धार्मिक स्थळांची नियमित देखरेख करणाऱ्यांनीच धार्मिक विधी कराव्यात. नागरिकांनी पूजा, अर्चा, नमाज पठण घरीच करावे. याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against the MLA for violation Parbhani News