गटबाजीने सभापतीपदाचा पेच, पंकजा मुंडे घेणार अंतिम निर्णय 

सुधीर एकबोटे 
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील पाटोदा पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असूनही वर्चस्व कोणत्या गटाचे राहणार, यावरून राजकारण रंगले आहे. अंतिम निर्णय माजी मंत्री पंकजा मुंडे याच घेणार आहेत

पाटोदा (जि. बीड) - नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत पाटोदा पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्व साधारण वर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. पूर्णपणे भाजपच्या ताब्यात असलेल्या पाटोदा पंचायत समितीत एकूण तीन महिला सदस्य आहेत. यापैकी विद्यमान सभापती या अनुसूचित जातीमधून आहेत; मात्र तालुक्‍यात सुरू असलेल्या गटबाजीच्या राजकारणामुळे सभापतीपदाचा निवडीचा पेच आणखीनच वाढला असून अंतिम निर्णय आता पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

एकूण सहा सदस्य संख्या असलेल्या पाटोदा पंचायत समितीत भाजपचे एकूण पाच सदस्य निवडून आलेले होते, तर एक सदस्य आमदार सुरेश धस यांच्या गटातील होता. सुरवातीला सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या प्रवर्गातील एकमेव सदस्य असलेल्या पुष्पा सोनवणे यांची वर्णी लागली होती; मात्र आता अडीच वर्षांनी पुन्हा एकदा सभापतीपदासाठी आरक्षण सोडत झाली आणि यामध्ये खुल्या प्रवर्गातील महिलासाठी हे पद राखीव करण्यात आले आहे.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

सद्यस्थितीत सौताडा गणातून निवडून आलेल्या सुवर्णा लांबरूड या एकमेव खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्य असून त्यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे; मात्र मधल्या काळात मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे यामध्ये धस आणि धोंडे असे दोन गट पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपासून यांची तीव्रता आणखीनच वाढत गेलेली पाहायला मिळतेय.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

अमळनेर गणातून निवडून आलेल्या व सद्यस्थितीत उपसभापती असलेल्या संगीता मिसाळ यांच्याही नावाची चर्चा सुरू असून गटबाजीच्या राजकारणात दोन्ही गटांकडून आपल्याला सोयीस्कर ठरणाऱ्या सदस्याला सभापती पद भेटण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर निर्णय पंकजा मुंडे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाटोदा पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात असूनही वर्चस्व कोणत्या गटाचे राहणार साठी प्रयत्न होताना दिसत आहेत. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final decision to take Pankaja Munde