लातूर बसस्थानकात प्रवाशाकडून गोळीबार, हल्लेखोरच जखमी 

दीपक क्षीरसागर
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

लातूर बसस्थानकात गुरुवारी (ता. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास प्लॅटफॉर्मच्या शेजारी थांबवण्यात आलेल्या बसमधूनच एका प्रवाशाने गोळीबार केल्याने खळबळ उडाली.

लातूर - येथील बसस्थानकात गुरुवारी (ता. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास प्लॅटफॉर्मच्या शेजारी थांबवण्यात आलेल्या बसमधूनच एका प्रवाशाने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. यामागचे कारण अद्याप समोर आले नसून, या घटनेत हल्लेखोरच जखमी झाला असून, तो फरारी आहे. दरम्यान, बसस्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. 

पंढरपूर-हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री साडेअकराच्या सुमारास लातूर मध्यवर्ती बसस्थानकात आली होती. दरम्यान, चालक-वाहक हे चहापाण्यासाठी खाली उतरले असता अचानक बसमधून अनोळखी प्रवाशाने खिडकीमधून बाहेर उभ्या असणाऱ्या कुणाला तरी मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली; मात्र गोळी लोखंडी रॉडवर आदळून हल्लेखोरालाच लागली. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला असून, त्याने बसस्थानकामधून पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात कडक पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. 
 
कुणावर करायचा होता हल्ला? 
हल्लेखोराने कुणावर पाळत ठेवलेली होती का, त्याला नेमके कुणाला मारायचे होते, तो कुठून बसमध्ये बसला होता आदी प्रश्‍न उपस्थित झाले असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. 
  

Web Title: Firing by passenger in Latur bus station