पावणेपंधरा कोटींच्या अपहारातील पहिला आरोपी बीडमध्ये अटकेत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १४ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांच्या अनियमिततेप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास अटक केली. बंडू राठोड असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बीड - येथील पंचायत समितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १४ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांच्या अनियमिततेप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास अटक केली. बंडू राठोड असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ३१ मे रोजी गुन्हा नोंद करून प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.  

ऑपरेटर बंडू राठोड, सहायक कार्यक्रम अधिकारी शाम पंडित, तांत्रिक सहायक प्रशांत आबुज या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. शाम पंडित व प्रशांत आबूज अद्याप फरारी आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तब्बल १४ कोटी ८० लाख रुपये इतक्या कामांची नरेगाच्या संकेतस्थळावर नोंद घेऊन फसवणूक व अपहाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला. गटविकास अधिकारी रवींद्र तुरुकमारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत हा गुन्हा नोंद झाला होता.

हेही वाचा - गेवराई तालुक्यात बालविवाह, ५० जणांविरुद्ध गुन्हा

बंडू राठोड याने वर्क कोड तयार केले व त्याआधारे तांत्रिक सहायक प्रशांत आबुज याने कार्यक्षेत्राबाहेरील जिओ टॅग निश्चित करुन १४ ते १८ मार्च २०२० या दरम्यानचे हजेरीपत्रक सहायक कार्यक्रम अधिकारी शाम पंडितने ॲडमिन लॉगिनमधून ॲप्रूव्ह केले, असा ठपका चौकशी समितीने या तिघांवर ठेवला आहे. कुठलेही अभिलेखे उपलब्ध नसताना लॉगिन पासवर्डचा गैरवापर करून अपहाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून तीनही फरार आरोपींचा शोध सुरू होता. सोमवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने बावी तांडा (ता. वडवणी) येथील घरातून बंडू राठोडला जेरबंद केले. फौजदार गोविंद एकीलवाले, सहायक फौजदार संजय जायभाये, बालाजी दराडे, मुंजाबा कुव्हारे, तुळजीराम जगताप, विकी सुरवसे यांनी ही कारवाई केली.

तीन दिवसांची कोठडी
अटक केलेल्या बंडू राठोड यास मंगळवारी (ता. १६) येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. राठोड याच्या अटकेनंतर आता या गुन्ह्याच्या तपासाला वेग येईल, असे निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first accused in the embezzlement of Rs 15 crore arrested in Beed