बसच्या प्रथमोचार पेटीलाच उपचाराची गरज 

File photo
File photo

नांदेड : जनसामान्यांसाठी गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी हे ब्रीदवाक्य घेवून परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अविरत सुरु आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एसटीच. प्रवासासाठी गावागावातील प्रवाशांची आजही एसटीवर मदार आहे. एसटीला खासगी वाहनांचा पर्याय असला तरीही एसटीसारखा आरामदायी व सुरक्षित प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांचा आजही एसटीकडेच कल आहे.
 
शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला जोडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस सद्यस्थितीत राज्यभरातील रस्त्यांवर धावत आहेत. अशातच एखादवेळी एसटीचा अपघात झाल्यास तातडीने प्रवाशांवर प्रथमोचार करता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील चालकांच्या कॅबीनमध्ये प्रथमोचार पेटी बसविण्यात आलेली आहे.  मात्र एसटीमधील प्रथमोचार पेटीमध्ये सर्व साहित्य आहे किंवा नाही याकडे महामंडळातील अधिकारी, चालक, वाहक व आगारातील कर्मचारी कोणीही लक्ष देत नसल्याने प्रथमोचार पेटीलाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे.

पेटीचा होतोय गैरवापर 
एखादेवेळी एसटीचा अपघात झाल्यास प्रवाशांवर प्रथमोपचार करता यावे म्हणून चालकाच्या कॅबीनमध्ये एक प्रथमोपचार पेटी ठेवण्यात येत असते. त्या पेटीमध्ये औषधी, पट्टी आदी असते. परंतु, जिल्ह्यातील सर्वच आगारातील बऱ्याच बसेसमध्ये ही प्रथमोपचार पेटीच नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. तर काही बसमध्ये प्रथमोपचार पेटी असली तर ती रिकामीच असते वा त्या पेटीचा वापर हा अन्य सामान ठेवण्यासाठी होतो.

वाहक व चालक अनभिज्ञ
ज्यावेळी चालकांना ड्युटीवर जाण्यासाठी बस दिली जाते त्यावेळी चालकाकडून त्या बसमध्ये डिझेल भरणे, हवा चेक करणे व ब्रेक वगैरे पाहणे ही जबाबदारी आहे, तशीच त्यांनी त्या गाडीमध्ये प्रथमोपचार पेटी आहे किंवा नाही व पेटी असेलतर त्या पेटीमध्ये प्रथमोपचाराचे सामान आहे किंवा नाही हे पाहणेही गरजेचे आहे. परंतु, वाहकाकडून या बाबींकडे कानाडोळा केल्या जातो. त्यामुळे या वाहक व चालकांना या प्रथमोपचार पेटीबद्दल किती गांभिर्य आहे हे स्पष्ट होते.

प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार
अपघाताच्या वेळी आवश्यक असणाऱ्या प्रथमोपचार पेट्यांचा एसटी बसमध्ये असणे व त्या पेटीमध्ये प्रथमोपचाराचे सामान असणे गरजेचे असल्याने चालक व वाहकांकडून एसटी बस ड्युटीवर नेण्याआधी तपासणे व त्या पेटीमध्ये प्रथमोपचाराचे सामान नसल्यास वरिष्ठांना याबाबत सूचना देणे प्रवाशांच्या हितास्तव गरजेचे आहे. याबाबत ओरड होत नसल्याने वरिष्ठांकडूनही याकडे कानाडोळा होत असून, प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे.

गांभीर्य नाही
बसमध्ये प्रथमोचार पेटी असणे किती महत्त्वाचे असते, याचे गांभीर्य चालक, वाहकांना दिसून येत नाही. यामुळे प्रवाशांसह एसटीच्या कर्मचाऱ्यांचेही भविष्य धोक्यात आले आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.
- सुधाकरराव काकडे पाटील (प्रवासी)
 
प्रथमोपचार पेट्या गेल्या कुठे
जिल्ह्यातून धावणाऱ्या बहुतांश बसमधील प्रथमोचार पेट्या गायब असल्याचे चित्र आहे. पेट्या गायब झाल्या की फेकून देण्यात आल्या. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
- रामचंद्र पवार (प्रवासी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com