esakal | हिंगोली आगारातुन ६० दिवसानंतर पहिली बस वसमतकडे धावली
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बस हिंगोली

हिंगोली आगारातुन ६० दिवसानंतर पहिली बस वसमतकडे धावली

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी टाळेबंदीचे आदेश काढल्याने तब्बल दोन महिने बस सेवा बंद असल्याने आगाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु करण्याचे आदेश विभाग नियंत्रकाला प्राप्त झाल्याने मंगळवारी (ता. २५) पहिली बस वसमत व वारंगा फाट्याकडे रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात संचारबंदीचे आदेश काढले होते. त्यानंतर राज्यशासनाने देखील एक मेपासून टाळेबंदी लागू केल्याने जवळपास जिल्ह्यातील शासकीय व खाजगी बससेवा पूर्णतः बंद पडली होती. त्यामुळे तिन्ही आगाराचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी नागरिकांचे विनाकारण फिरणे बंद होणे गरजेचे होते.

मार्च महिन्यात बससेवा सुरु असल्याने ठिकठिकाणच्या बसस्थानकात प्रवाश्यांची अँटीजन चाचणी केली जात होती. नंतर मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने बससेवा देखील बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत जिल्ह्यातील बससेवा चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी (ता. २४) काढले आहेत त्यामुळे मंगळवारी पहिली बस धावली आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून उपययोजना अंतर्गत जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या बसस्थानकात येणाऱ्या, जाणाऱ्या प्रवाश्यांची अँटीजन चाचणी बंधनकारक करण्यात आली. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा तसेच बसस्थानकात बँरिकेटस लावण्यासाठी पालिका मुख्याधिकारी यांच्याशी समन्वय साधून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी जयवंशी यांनी राज्य परिवहन मंडळाच्या आगार प्रमुखांना दिल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे