esakal | Beed : आधी दुष्काळ, आता अतिवृष्टीचा कहर
sakal

बोलून बातमी शोधा

Beed : आधी दुष्काळ, आता अतिवृष्टीचा कहर

Beed : आधी दुष्काळ, आता अतिवृष्टीचा कहर

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी : पावसाळ्याच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांना काळजी होती. त्यानंतर आता गेल्या महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीने व निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुका हा कायमच दुष्काळी समजला जातो. यावर्षीही सुरुवातीचे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत पावसाने तालुक्यात क्वचितच हजेरी लावली. पावसाचा अभाव, ढगाळ वातावरण व जोरदार वारे यामुळे शेतकऱ्यांची पिके कोमेजून गेली. पिकांवर रोग पडून मोठे नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटल्याचे समाधान असले तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान या पावसाने केले आहे.

उडीद, मूग,सोयाबीन, कापूस, तूर, कांदा या नगदी पिकांबरोबरच फळबागा व इतर पिकांचे पावसाच्या अभावी व नंतर अतिवृष्टीनेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, अपेक्षेच्या निम्मे पीकही हाती लागणार नाही अशी स्थिती असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची शासनाने भरपाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पिकांवर संकटच

मृगाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या केल्या. परंतु नंतर पाऊस गायब झाला. ढगाळ व विषम वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत होता. मुगाचे पीक निम्मेअधिक हाती आल्यानंतर सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. कोंब फुटून हे उत्पादनही निम्म्यावर आले. आताही सुरू असलेल्या पावसाने फळबागांसह कापूस, कांदा, तूर भुईसपाट झाली आहे. पिकांवरचे हे संकट शेतकऱ्यांना आर्थिक फटका देणारे ठरले आहे. गेल्या महिन्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने हाहाकार उडवला आहे. शासकीय पातळीवर पंचनामा व पाहणी दौरे उरकले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडलेले नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासनाने तातडीने भरीव मदत देण्याची गरज असून, शेतकरी नुकसान भरपाईची आतुरतेने वाट पाहत आहेत.

loading image
go to top