कळमनुरीत पाच दिवसांची संचारबंदी

संजय कापसे
Sunday, 28 June 2020

शहरातील कोरोना झालेल्या नागरिकांची एकूण संख्या सात झाली आहे. यामुळे आजाराचा संसर्ग शहरात वाढणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस नगरपालिका हद्दीत संचारबंदी जाहीर केली आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : शहरातील काझी मोहल्ला भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (ता.२९) पाच दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

शहरातील काझी मोहल्ला येथील एका महिलेला नांदेड येथे उपचारा दरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांना आजाराचा संसर्ग झाला होता. त्यानंतर प्रशासनाने हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. 

हेही वाचाखते, बियाणांचे ३३० नमुने प्रयोगशाळेकडे, अहवालाची प्रतिक्षा... -

२९ जणांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात

आरोग्य विभाग व प्रशासनाने या भागातील नागरिकांशी संवाद साधून आरोग्य तपासणीचे आवाहन केले होते. यात १८ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले. यापैकी परत तीन जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परत या भागातील २९ महिला व नागरिकांना शनिवारी (ता.२७) संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये हलवून त्यांचे स्वॅब नमुने घेतले. 

सर्व सीमा बंद करण्याचे आदेश

 शहरातील कोरोना झालेल्या नागरिकांची एकूण संख्या सात झाली आहे. यामुळे आजाराचा संसर्ग शहरात वाढणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस नगरपालिका हद्दीत संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात शहराच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला 

नगरपालिका हद्दीमधील सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाकडून सर्व सीमा बंद करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलिस प्रशासनानेही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला आहे. 

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारपर्यंत राहणार सुरू

दरम्यान रविवारी (ता.२८) उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, श्रीराम पाचपुते यांची बैठक घेऊन संचारबंदी काळात खासगी रुग्णालय, औषधी व दूध डेअरीसाठी सकाळी नऊ ते दुपारी एक अशा वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. 

येथे क्लिक करा कोरोना :  रुग्ण बरे होण्याच्या दरात हिंगोलीचा दुसरा क्रमांक -

कृषी केंद्र विक्रेत्यांना सूट मिळावी

तर पीककर्ज व इतर कामासाठी बँकांमधून होणारी गर्दी कमी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. पेरणीचे दिवस पाहता शेतकरी व कृषी केंद्र विक्रेत्यांनाही सूट मिळावी, अशी मागणी होत आहे. शहरात पाच दिवस संचारबंदी लागणार हे निश्चित झाल्यानंतर शहर व परिसरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा दुकान, भाजीपाला व पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे चित्र दिवसभर होते.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोचली

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचीसंख्या आता २६१ वर पोचली आहे.  त्यापैकी २३४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरीसोडण्यात आले आहे. सध्या  २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five-Day Curfew In Kalamanuri Hingoli News