बीड जिल्ह्यातील तीन अपघातांत पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला.

बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार, तर एक जखमी झाला. वानगाव फाटा (ता. बीड) येथील अपघातात चौघे जखमी झाले.

मनीषा ज्ञानेश्वर जाधव (वय ३५), लावण्या ज्ञानेश्वर जाधव (आठ, दोघीही रा. परभणी), गणेश कैलास राठोड (३०), रोशन गणेश राठोड (११), शोभा गणेश राठोड (२६, तिघेही रा. सुंदरनगर तांडा, ता. पाथरी) अशी मृतांची नावे आहेत. 

परभणी येथे एका खासगी व्यवस्थापनात अभियंता असलेले ज्ञानेश्वर जाधव हे विवाहसाठी पुण्याला गेले होते. पत्नी मनीषा, मुलगी लावण्यासह ते कारने परभणीत परतत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास महामार्गावरील कोळगावजवळील (ता. गेवराई) सूर्यमंदिरासमोर त्यांच्या कारला जीपने धडक दिली. याच वेळी काजळा येथील ज्ञानेश्वर साबळे हा दुचाकीवरून जात असताना तोही या जीपला धडकला. या वेळी जाधव यांची कार व दुचाकीनेही पेट घेतला. कारचे दरवाजे बंद असल्याने कोणालाच बाहेर पडता येत नव्हते. कोळगाव येथील ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर जाधव, मुलगी लावण्याला कारची समोरील काच फोडून बाहेर काढले. तोपर्यंत गर्भवती मनीषा जाधव पूर्ण भाजल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर जाधव, लावण्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान लावण्याचा मृत्यू झाला. कारला धडक देणाऱ्या जीपमधील सर्व तरुण मद्यधुंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जीपमध्ये दारूच्या बाटल्याही आढळल्या. पेटलेल्या कारमधील लोकांना वाचविण्याऐवजी हे सर्वजण पसार झाले. 

दुचाकी अपघातात तिघे ठार
नंदकुमार ऊर्फ गणेश कैलास राठोड, रोशन गणेश राठोड, शोभा गणेश राठोड आणि रोहन गणेश राठोड (सर्व रा. सुंदरनगर तांडा, पाथरी) हे दुचाकीवरून उपळी (ता. वडवणी) येथून गावाकडे जात होते. ब्रह्मनाथ तांड्याजवळ (ता. वडवणी) त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात सर्वच जण उडून रस्त्यावर फेकले गेले. यात गणेश, शोभा आणि रोशन या तिघांच्याही डोक्‍याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. रोहन गंभीर जखमी झाला. दरम्यान, उस्मानाबादहून औरंगाबदला जाणाऱ्या अल्टो कारला ट्रकने धडक दिल्याने कारमधील पती-पत्नीसह दोन चिमुकले जखमी झाले. धुळे-सोलापूर महामर्गावरील वानगाव फाट्याजवळ हा अपघात झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five killed in three accidents in Beed district