नकली सोने देऊन महिलेची पाच लाखाची फसवणूक  

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 27 जानेवारी 2020

हा प्रकार अर्धापूर शहरातील देशमुख पेट्रोल पंपसमोर गुरूवारी (ता. २३) रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला. फसवणूक झालेली महिला अहमदनगर जिल्ह्याची आहे. 

नांदेड : अर्धा किलो सोन्यापायी एका अहमदनगरच्या महिलेला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या दोघांविरुध्द अर्धापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार अर्धापूर शहरातील देशमुख पेट्रोल पंपसमोर गुरूवारी (ता. २३) रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला. फसवणूक झालेली महिला अहमदनगर जिल्ह्याची आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जयश्री अशोक कुदनर (वय २६) (रा. शिंदोडी ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) यांच्याशी सुनील राठोड उर्फ केशनव आलेवाड (वय ३३) आणि त्याचा साथिदार रामु भोसले (वय ७२) दोघे रा. ह. मु. वडगाव ता. मावळ (जिल्हा पुणे) यांनी ओळख केली. ओळखीतून एकमेकांचा विश्‍वास संपादन करून आमच्याकडे अर्धा किलो सोने आहे. ते कमी पैशात विकायचे ठरवले आहे. तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला साडेसात लाखामध्ये अर्धा किलो सोने देतो. असे म्हणून त्या आरोग्य विभागात कर्मचारी असलेल्या महिलेला विश्‍वासात घेतले. आमचे मुळ गाव नांदेडमध्ये अर्धापूर आहे असे म्हणून त्यांनी तिला अर्धापूर येथे बोलाविले. 

हेही वाचानांदेड जिल्ह्यातील गुणवंताचा पुरस्कार देऊन सन्मान

अर्धा किलो नकली सोने दिले

सोन्याच्या आमिषापायी ती महिला गुरूवारी (ता. २३) अर्धापूर येथे आली. तिला या दोन्ही भामट्यांनी पाच लाख रुपये घेऊन अर्धा किलो नकली सोने दिले. एवढेच नाही तर अडीच लाख रुपये आमच्या बँक खात्यात टाकण्याचे सांगितले. त्या महिलेनी सोने घेऊन अती आनंदात आपल्या घरी पोहचली. विश्‍वासून सोनाराला दाखविले असता ते सोने नकली असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यांनात डोक्याला हात लावून बसलेल्या या महिलेनी त्या दोन्ही भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी काही संपर्क झाला नाही. 

हे उघडून तर पहाआमचा चित्रपट बरा चाललाय- अशोक चव्हाण

दोन भामट्यांवरुद्ध गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने परत अर्धापूर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ गुट्टे यांना सांगितले. श्री. गुट्टे यांच्या आदेशावरून अर्धापूर पोलिस ठाण्यात जयश्री कुदनर यांच्या फिर्यादीवरून केशनव आलेवाड आणि राम भोसलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुक झालेल्या महिलेशी संपर्क चलभाष यंत्रावरून संपर्क साधला असता तीने मला खोटे नाव सांगुन फसवणुक केल्याचे सांगितले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून संपर्क होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नांदगावकर करत आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh cheating of woman by giving fake gold, Nanded news.