विरोधकांना "त्या' पाच जणींनी दिले कृतीतून उत्तर

हरी तुगावकर
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांवर उपचारासोबत दिला मानसिक आधार 

लातूर ः सांगली, कोल्हापूर भागांतील पूरग्रस्तांवर उपचार करणाऱ्यासाठी गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन डॉक्‍टर मुलींना पहिल्यापासूनच बोलणी खावी लागली. सोलापूरला गेल्यानंतर तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी पाठवले? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तेथून पुढे सांगली, कोल्हापूरला गेल्यानंतर तेथेही तुम्ही कशाला आला, असेच प्रश्न विचारून विरोध करण्यात आला. पुरुषी मानसिकतेचा विरोध झुगारून या पाचही डॉक्‍टर मुलींनी रात्रंदिवस पूरग्रस्तांवर उपचार केले. नव्हे तर त्यांना मानसिक आधार देत या धक्‍क्‍यातून बाहेर काढले. पूरग्रस्तांवर उपचारासाठी राज्यातून गेलेल्या पाचशे डॉक्‍टरांमध्ये फक्त या पाच डॉक्‍टर मुली होत्या. 

सांगली आणि कोल्हापूर भागांत महापूर आला. शेकडो गावे उद्‌ध्वस्त झाली. लाखो संसार उघड्यावर आली. महापुरामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. राज्यभरातून शासकीय डॉक्‍टरांची अनेक पथके तेथे गेली होती. त्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वीस जणांचे एक पथक प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत गोरे व उपअधिष्ठाता डॉ. आनंद ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेले होते. या पथकाचे नेतृत्व डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले. यात पाच डॉक्‍टर मुलींचा समावेश होता. त्यात डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा कठारे, डॉ. पूजा पाटील, डॉ. नाझनीन डांगे, डॉ. लक्ष्मीप्रिया एन. एस. यांचा समावेश होता. या सर्व डॉक्‍टर असलेल्या सर्व मुली स्वेच्छेने पूरग्रस्त भागात गेल्या होत्या.

हे पथक पहिल्यांदा सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले. तेथूनच या मुलींना विरोध सुरू झाला. हा पहिला टप्पा पार 
केल्यानंतर हे पथक सांगली, कोल्हापूरला गेले. तेथेही तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी पाठवले, तुम्ही परत जा असे त्यांना ऐकावे लागले. शासकीय स्तरावर त्यांना पुरुषी मानसिकतेचा सामना करावा लागला.

या सर्व प्रकाराला न जुमानता या पाचही डॉक्‍टर मुली पूरग्रस्तांची सेवा करण्याच्या भावनेतून तेथेच थांबल्या. ज्या गावात कोणी पोचले नव्हते, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी पूरग्रस्तांची उपचार करून सेवा केली. इतकेच नव्हे तर मानसिक आधार देत पूरग्रस्तांना या धक्‍क्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यभरातून सुमारे पाचशे डॉक्‍टर पूरग्रस्त भागात आली होती. त्यात फक्त पाच या डॉक्‍टर मुली होत्या. इतर सर्व पुरुष डॉक्‍टर होते.

टप्प्याटप्प्याने ही पथके तेथून परतू लागली आहेत. लातूरचे पथकदेखील परत आले आहे. यात पहिल्यांदा पुरुष डॉक्‍टरच परत आले. या पाचपैकी तीन मुली सर्वांत उशिरा येथे आल्या. पुरुष डॉक्‍टरांपेक्षा जास्त दिवस राहून त्यांनी काम करून त्यांना विरोध करणाऱ्यांना कृतीतून उत्तर दिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five women doctors serve in sangli kolhapur