esakal | बोरनदीच्या पुलावरून पुराचे पाणी शिरले लासुरगावात Marathwada
sakal

बोलून बातमी शोधा

Marathawada

बोरनदीच्या पुलावरून पुराचे पाणी शिरले लासुरगावात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लासूर : लासूरगाव (ता.वैजापूर) येथील शिवना नदीला पुन्हा पूर आला आहे. नदीवरील फरशी पूल पाण्याखाली असून मुंबई (Mumbai) -महामार्गावरील पुलावर पाणी असून बोर दहेगावच्या बोर नदीच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने महामार्ग बंद झाला आहे. लासूरगावात ३० वर्षांनी अशी पूर परिस्थिती दुसऱ्यांदा ओढवली. देवी दाक्षायणी मंदिर आवारात पाणी शिरले आहे.

लासूर स्टेशन परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून लासूरगावच्या शिवना नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. दरम्यान नदीवरील फरशी पूल दिसेनासा झाला असून पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने वाहतूक बंद आहे. लासूरगावासह अमानतपुरवाडी, राहेगाव, भायगाव, उंदिरवाडी, धोंदलगाव आदी गावांचा लासूर स्टेशनशी संपर्क तुटला असून नदीकाठी असलेल्या दाक्षायणी देवीच्या मंदिर परिसरात पुराचे पाणी घुसले व गावात वेशीच्या आत पाणी पोचले.

गेल्या पुरापेक्षा आताची पूरपरिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बोर दहेगावच्या बोर नदीला पूर आलेला असल्याने वाहतूक खोळंबली नागपूर-मुंबई महामार्ग बंद झाला आहे. सावंगीची मार्तंडी नदीची ओसंडून वाहत असल्याने नदीवर अवलंबून असलेला शिल्लेगाव प्रकल्प यंदा भरण्याची चिन्हे आहेत. परिसरात पडलेल्या प्रचंड अशा पावसाने छोटे मोठे पाझर तलावही फूल झाले आहे तर शिवना नदीतील सर्वच केटीवेअर मागच्या पुरातच फुटल्याने पाणी अडण्याची शक्यता नाही.

हेही वाचा: पवनानगर : पवना नदीवरील थुगाव पुलावरून होतोय धोकादायक प्रवास

शिवनाच्या फरशी पुलावरून पाणी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे लासुरगावात जाणाऱ्यांना परतून तब्बल सहा किलोमीटर फेरा मारून मुंबई महामार्गावरील पुलावरून लासुरगावात जावे लागत आहे. या तिन्ही नद्यांच्या पाण्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. परंतु शेतात पाणी तुंबल्याने पिके सडली असून शेतकऱ्याने अतोनात नुकसान झाले आहे.शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या शेतशिवारासह लासूरगावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली होती. प्रशासनाने आताही सावधगिरीचा इशारा दिला आहे.

loading image
go to top