मुलासाठी हंबरडा फोडणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर फुलले हसू 

राजेश दारव्हेकर 
Wednesday, 6 January 2021

हिंगोली शहरातील गांधी चौकात बुधवारी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या उपस्थितीत वार्षिक तपासणी दरम्यान गांधी चौक येथे हरवलेल्या इसमाचे फोटो प्रदर्शन कार्यक्रम असल्याने कामात व्यस्त असतानाच हा प्रकार घडला. 

हिंगोली : एकीकडे परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या उपस्थितीत वार्षिक तपासणी अन् हरवलेल्या इसमाचे फोटो प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्‍घाटन अन् त्याचवेळी अचानक एक महिलेचा पाच वर्षाचा मुलगा हरवतो, त्याला शोधण्यासाठी मुलाची आई हंबरडा फोडत अधिकाऱ्यांसमोर येते. त्यावेळी पोलिस निरीक्षक उदय खंडेराय हातातले काम बाजुला सारून हरवलेल्या मुलाच्या तपासासाठी यंत्रणेला कामाला लावतात. अवघ्या काही वेळातच सदरील मुलाचा शोध घेत त्याला मातेच्या हवाली केले, त्यावेळी हंबरडा फोडुन रडणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर आनंदाने हसु फुलले. हा प्रकार शहरात बुधवारी (ता.सहा) दुपारी घडला. 

शहरातील गांधी चौकात बुधवारी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या उपस्थितीत वार्षिक तपासणी दरम्यान गांधी चौक येथे हरवलेल्या इसमाचे फोटो प्रदर्शन कार्यक्रम असल्याने कामात व्यस्त असतानाच दुपारी तीनच्या दरम्यान अचानक एक महिला हंबरडा फोडत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर आली व साहेब माझा पाच वर्षाचा मुलगा साहिल उर्फ चिकु संतोष सरोदे, रा.साटंबा, ह.मु.मस्तानशहा नगर हा आत्ताच जंक्शन रेडीमेड दुकानापासुन हरवला आहे तो मला मिळवून द्या, असे म्हणून मोठ्याने रडत होती. 

हेही वाचा - राज्यातील पशु चिकित्सालयांच्या वेळेत झाला बदल ; पशुपालकांना होणार सोयीस्कर

सीसीटीव्ही फुटेज तपासले 
पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी हातातले काम बाजुला सारून सदर मातेची समजुत काढुन पोलिस उपनिरीक्षक एस.एस.घेवारे यांना सदर प्रकरणात तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले. त्यावरून श्री.घेवारे यांनी सदर मातेला घेऊन जंक्शन रेडीमेड दुकानात जाऊन हरवलेल्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले व सदरच्या मुलाची फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवुन तसेच पोलिस स्टेशन हिंगोली शहर येथील पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती दिली व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलिस अंमलदार असे खाजगी लोकांना सदर मुलाचे फोटो दाखवून सदर मुलाचा शोध घेतला असता काही वेळातच सदरचा मुलगा हा गोदावरी कॉर्नर येथे रडत उभा असलेला मिळुन आल्याने त्याला तत्काळ मातेच्या हवाली केले असता हंबरडा फोडुन रडणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर क्षणात हसु फुलले.

हेही वाचा - सेनगावात गटविकास अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने पंचायत समिती सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार

यांनी केला तपास 
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे, श्री.पार, श्री.कुडमेते, शेख शकील, राजुसिंग ठाकुर यांच्या पथकाने केली.  

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers smile on the face of the mother who bursts the humbarda for the child, Hingoli News