चारा सडला, उसाच्या मागणीत वाढ

नवनाथ इधाटे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

ऑक्‍टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर जनावरांसाठी असलेला मका व बाजरीचा चारा संततधारेमुळे सडल्याने शेतकऱ्यांना आतापासूनच चाराटंचाई निर्माण झाली आहे.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : ऑक्‍टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर जनावरांसाठी असलेला मका व बाजरीचा चारा संततधारेमुळे सडल्याने शेतकऱ्यांना आतापासूनच चाराटंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना जगविण्यासाठी महागड्या उसाची खरेदी करावी लागत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्‍यात सुमारे 92 गावे असून 70 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोचविल्या जातात. सतत तीन -चार वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळातून सावरत शेतकऱ्यांनी यंदा तालुक्‍यात सुमारे 54 हजार हेक्‍टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड केली होती.

खरिपातून चांगले उत्पन्न मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत केली; मात्र पिके ऐन शेवटच्या टप्प्यात असताना दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर असा सतत पंधरा दिवस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीन, मका व कपाशी पिकांना कोंब आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीत जनावरांसाठी असलेला मका व बाजरी पिकांचा चारा सडल्याने शेतकऱ्यांसमोर चाराटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना अपुरा चारा असल्याने रब्बीच्या पिकात चारापिकांचीही शेतकरी लागवड करताना दिसून येऊ लागला आहे. आतापासूनच चाराटंचाई निर्माण झाल्याने उसाचा चारा खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या उसाच्या चाऱ्याचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याने शासनाने चारा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

जनावरांना चाऱ्याची टंचाई
फुलंब्री तालुक्‍यात आतापासूनच जनावरांना चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात चारा पिकाचीही लागवड करण्यास सुरवात केली आहे. जनावरांसाठी टाकलेल्या मका, बाजरी या चारापिकांवर परतीच्या पावसाने तब्बल पंधरा दिवस संततधार ठेवल्याने चारा सडून गेला आहे. बुरशी लागलेला चारा पूर्णपणे सडल्याने जनावरे या चाऱ्याला तोंडसुद्धा लावत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने चारा खरेदीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
----

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fodder Spoiled, Sugar Cane Increase