अबब...! परभणीत विदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त

हस्तगत करण्यात आलेला सिगारेटचा माल नेतांना पोलिस कर्मचारी.
हस्तगत करण्यात आलेला सिगारेटचा माल नेतांना पोलिस कर्मचारी.

परभणी : भारतात प्रतिबंधित असेलल्या व विदेशी बनावटीच्या महागड्या सिगारेटच्या परभणीत करण्यात आलेल्या साठ्यावर नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.१३) दोन ठिकाणी छापा मारून ८ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहरात विदेशी बनावटीच्या व भारतात प्रतिबंधीत असणाऱ्या महागड्या सिगारेटचा मोठा साठा असल्याची माहिती कॅन्सर ग्रस्तांच्या सर्व्हे करणाऱ्या मुंबई येथील एका खासगी सामाजिक संस्थांना मिळाली होती. या माहितीवरून या सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी परभणी येथे आले. त्यांनी नानलपेठ व कोतवाली पोलिसांच्या मदतीने शहरातील स्टेशनरोडवरील एका व मोंढा भागातील एका जर्दा स्टोअरच्या दुकानावर सोमवारी (ता.१३) दुपारी छापा मारला. या दोन्ही दुकांनात विदेशी बनावटीच्या सिगारेटचा मोठा साठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तातडीने हा साठा हस्तगत केला. हस्तगत करण्यात आलेला मुद्देमालाची पोलिसांनी मोजदाद केली असता त्याची किंमत ८ लाख ८७ हजार रुपयांपर्यत गेली आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात फिर्यादी विजय उत्तम पवार यांच्या फिर्यादीवरून मो. आलीम मो. युसुफ अन्सारी व कोतवाली पोलिस ठाण्यात शेख शकील शेख जमील व शेख अखील शेख जमील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पैकी मो. अलीम यास अटक करून जमानतीवर सोडण्यात आले. तर कोतवाली पोलिसांनी शेख अखील यास अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन वाघमारे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केली.

विदेशातील नामांकित ब्रॅन्डचा समावेश
शहरातील दोन्ही दुकानात सापडलेला सिगारेटचा मुद्देमाल हा विदेशी बनावटीचा व नामांकित ब्रॅन्डचा आहे. यात पॅरीस, ब्लॅक, गुडंग गरम, रुलीव रिव्हर, ए -१०, गोल्ड, के - १ गरम या सात ब्रॅन्डचा समावेश आहे. हे ब्रॅन्ड विदेशातील महागड्या सिगारेट आहेत. 

१४२३ बॉक्समध्ये ८ लाखाच्या सिगारेट
नानलपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिगारेटचे ५४३ बॉक्स जप्त करण्यात आले. यात गुडंगगरमचे ४८ बॉक्स (१ लाख ९२ हजार रुपये), ब्लॅक ५० बॉक्स ( १ लाख ५० हजार रुपये), पॅरीस ११ बॉक्स (३३ हजार रुपये), रुलीव रिव्हर ९ बॉक्स ( २७ हजार रुपये), ए -१० ९ बॉक्स (२ लाख २५ हजार रुपये), गोल्ड १२५ बॉक्स ( १ लाख ४० हजार रुपये), के -१ गरम १०० बॉक्स (५० हजार रुपये) अश्या किंमती आहेत.

पाकीटावर नव्हती वैधानिक इशारा
आपल्या देशात सिगारेटच्या पाकीटावर सिगारेट पिल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असा वैधानिक इशारा छापणे बंधनकारक आहे. परंतू, सोमवारी जप्त करण्यात आलेल्या पाकिटावर कुठल्या ही प्रकारची सुचना वा इशारा छापलेला नाही.

सिगारेटचा माल स्मगलिंगद्वारे आणला ?
भारतात विना इशाऱ्याचे सिगारेट पाकीटं सापडली. यामुळे हा माल विदेशातून थेट भारतात आला कसा याची माहिती पोलिस घेत आहेत. हा माल स्मगलिंगद्वारे भारतात आणला असावा असा अंदाज पोलिसांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com