माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू 

गणेश पांडे
Saturday, 11 July 2020

भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १०) रात्री घडली. 

परभणी : शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १०) रात्री घडली. 

माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाउनमुळे मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत आला होता. शुक्रवारी (ता. १०) संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज फड हा त्याची स्क्रॅमलर डुक्याटी या दुचाकीवरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचले. या अपघाताने कुटुंबियावर मोठा आघात झाला.

दुचाकी समोरून पूर्णपणे चकनाचुर

शुक्रवारी संध्याकाळी पृथ्वीराज फड हा गंगाखेड रस्त्याने जात असताना हा अपघात झाला. ज्यात अत्यंत महागडी असलेली त्याच्या बुगाटी कंपनीची दुचाकी समोरून पूर्णपणे चकनाचुर झाल्याने हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहनाबरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही. कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती. त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

हेही वाचा -  विधायक : अखंड निःस्वार्थ सेवेची आठ वर्षे पूर्ण

आंबरवाडी येथे आजोबानी केला नातवाचा खून

जिंतूर :  बामणी पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या अंबरवाडी येथील मधुकर तुकाराम काळे (वय २२ )या नातवाचा खून आजोबा असणारे ज्ञानेश्‍वर काळे (वय ७०) यांनी निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

मधुकर तुकाराम काळे हा युवकास सावत्र आई आहे. वडील तुकाराम काळे हे खाजगी संस्थेत सेवक आहेत. येणारे वेतन हे दोन दोन समान भागात वाटून द्या. असा तगादा मयत मधुकर काळे लावत होता. मात्र, त्यांची सावत्र आई व वडील पगारातले पैसे वाटून देत नसत. त्यामुळे मयत मधुकर व सावत्र आई आणि वडील नेहमी खटके उडत. वेळप्रसंगी शिवीगाळ करून मारहाणीचे प्रकार घडत. आजोबा ज्ञानोबा काळे यांच्या सोबत नातू मधुकर काळे हा झोपलेला असताना आजोबांनी दोरीने गळा आवळून जीवे मारून टाकले व मयत मधुकर हा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावल्याचा आव आणला. तसे भासून खूनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके हे करीत आहेत

दरम्यान, या प्रकरणात वरील आशयाची तक्रार मयताची आई मंगल तुकाराम काळे (वय ४२) यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यावरून आरोपी आजोबा ज्ञानोबा तुकाराम काळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके हे करीत आहेत. जिंतूर न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Mohan Phad's son dies in accident parbhani news