उमरगा : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर चौदा गावांतील ४३ जणांचे हरकती व आक्षेप

अविनाश काळे
Tuesday, 8 December 2020

उमरगा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर याद्यावर आक्षेप नोंदविण्याची सोमवार (ता.सात) अखेरचा दिवस होता.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर याद्यावर आक्षेप नोंदविण्याची सोमवार (ता.सात) अखेरचा दिवस होता. दरम्यान चौदा गावांतील ४३ जणांनी मतदार याद्यावर आक्षेप नोंदवला असून त्यात बहुतांश प्रभाग, वॉर्डात नावात बदल झाल्याचे आक्षेप अधिक आहेत. उमरगा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाच्या कालावधी संपल्याने प्रशासनाने पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.

एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ती ग्रामपंचायत कार्यालयात डकवण्यात आली आहे. सोमवारपर्यंत हरकती व आक्षेप स्वीकारण्यात आल्या. दरम्यान एका प्रभाग, वॉर्डातून दुसऱ्याच ठिकाणी नाव गेल्याचे बहुतांश आक्षेप आहेत. एकाच कुटुंबातील पती-पत्नी, मुले अथवा आई - वडील यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात असल्याने ते एकाच प्रभागात यावीत असे आक्षेपही आहेत. सर्वाधिक आक्षेप घेणाऱ्या अर्जांची संख्या मूरळी येथील बारा तर कुन्हाळी येथील नऊ जणांनी हरकती घेतल्या आहेत.

कदेर, तलमोड, पेठसांगवी, कवठा, एकोंडी जहागीर), सुपतगांव, हिप्परगाराव, गुंजोटी, थोरलीवाडी, भगतवाडी, काळालिंबाळा, गुरुवाडी - चंडकाळ या गावांतील ४३ जणांचे प्रारूप मतदार यादीवर हरकती, सूचना प्राप्त झाल्या आहेत. मंगळवारी (ता. आठ) या हरकती विषयीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार असून निवडणूक विभागाकडून दोन दिवसात अर्जातील मुद्दानुसार योग्य त्या ठिकाणी बदल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (ता.दहा) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सरपंचपदाच्या आरक्षणाचे वेध
४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होईल. त्याची नेमकी तारीख निश्चित नसली तरी सरपंचपदाची इर्षा बाळगणाऱ्या गाव पुढाऱ्यांना निश्चित आरक्षणाची हमी हवी आहे. मात्र सोडतीप्रमाणे अथवा शासनाच्या निकषाप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावातील निवडणुकीचे चित्र जाणवणार आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty Three People Take Objection On Ward Restructure Umarga