
केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी बांधवानी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी (ता.आठ) रस्त्यावर उतरले होते.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी बांधवानी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी (ता.आठ) रस्त्यावर उतरले होते. श्री. छत्रपती शिवाजी चौक, राष्ट्रीय महामार्गावर थांबून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. दरम्यान शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात लागू केलेले जाचक कायदे त्वरीत रद्द करावेत. यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्ष पहिल्यांदाच आंदोलनासाठी एकत्र आले. प्रारंभी शिवाजी चौकात व नंतर राष्ट्रीय महामार्गावर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पदाधिकाऱ्यांनी मूकमोर्चाद्वारे उपविभागीय कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील, काँग्रेसचे दिलीप भालेराव, डॉ. शौकत पटेल, विजयकुमार सोनवणे, शिवसेनेचे अब्दुल रज्जाक अत्तार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी निर्णयावर टीका करून सरकारच्या हुकूमशाही पद्धतीचा निषेध केला.
या आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पवार, महाविकास आघाडीचे नानाराव भोसले, चंद्रशेखर पवार, अतिक मुन्शी, दळगडे, अनिल सगर, सतीश सुरवसे, याकुब लदाफ, शरद पवार, शमशोद्दिन जमादार, रमेश जाधव, अजित पाटील, ख्याजा मुजावर, अमोल पाटील, धनराज टिंकाबरे, निजाम व्हंताळे, खालिद शेख, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष भागवत सोनवणे, सोहेल इनामदार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान बंदला व्यापारी महासंघ व भिमराष्ट्र ग्रूपचे संस्थापक सचिन माने यांनी पाठिंबा दिला.
संपादन - गणेश पिटेकर