जालना जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे चार एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे साडेचार लाखांचे नुकसान

लक्ष्मीकांत कुलकर्णी
Friday, 27 November 2020

कुंभार पिंपळगाव (जि.जालना)  येथील शेतकरी जगन बन्सीधर कंटुले यांच्या गट क्रमांक ४२२ शेतातुन जाणाऱ्या राजाटाकळी-अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने चार एकर क्षेत्रातील ऊसाने पेट घेतला. यात ऊस जळुन खाक झाला.

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) : येथील शेतकरी जगन बन्सीधर कंटुले यांच्या गट क्रमांक ४२२ शेतातुन जाणाऱ्या राजाटाकळी-अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने चार एकर क्षेत्रातील ऊसाने पेट घेतला. यात ऊस जळुन खाक झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२७) घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कंटुले यांच्या शेतातुन राजाटाकळी-अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनी गेलेली आहे.

या वाहिनीच्या जीर्ण झालेल्या तारा लोंबकळलेल्या आहेत. खांबावर तारा बांधलेल्या चिनी मातीच्या चिमण्या फुटलेल्या आहेत. यामुळे तारांना धर राहिलेली नाही. तारा मोकळ्या झाल्या आहेत. शुक्रवारी दिवसभर वारे असल्याने या तारांचे घर्षण झाले. यामुळे एक तार खांबावर असलेल्या चिमणीतुन निसटुन ऊसावर पडली आणि ऊसाने पेट घेतला. वारे असल्यामुळे ऊस पेटतच गेला. मात्र ऊसाला आग लागल्याचे कळताचं जवळपासचे शेतकरी शेताजवळ जमले आणि ऊस आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. यात पूर्ण ऊस जळुन खाक झाला. यामुळे या शेतकऱ्याचे चार ते साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

अनेक वेळा सांगूनही दुर्लक्ष
परतीच्या पावसाने शेतशिवारातील अनेक विजेचे खांब वाकलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या तारा लोंबकळलेल्या आहेत. तारा बांधण्यासाठी असलेल्या खांबावरील चिमण्या फुटलेल्या आहेत. यामुळे बांधलेल्या तारा निसटुन खाली येतात. या तारा कधी तुटतील हे सांगता येत नाही. महावितरण कंपनीने पाऊस उघडल्यानंतर कुठलीही दुरूस्तीची कामे केली नाहीत. या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले होते. मात्र याकडे लक्ष दिल्या गेले नाही. यामुळे हे नुकसान झाले, असे शेतकरी जगन कंटुले यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Acre Sugarcane Crops Burned In Short circut Jalna News