जालना, बीड जिल्ह्यांत चार शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "कर्जामुळे आत्महत्या करीत असून, घरातील कोणालाही दोषी ठरवू नये,' अशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतीचे कर्ज असल्यामुळे उसनवारी करून त्यांनी दीड वर्षापूर्वी एका मुलीचे लग्न केले होते. नापिकीमुळे कर्जफेड, आगामी खरिपाची पेरणी कशी करावी, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

वाकुळणी (ता. बदनापूर) येथील शेतकरी सुनील जगन्नाथ कोळकर (37) यांनी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची वीस एकर शेती असून, बॅंकेकडून साडेपाच लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. उधार उसनवारीने हफ्ते नियमित फेडले, मात्र नापिकीने मार्चचा हफ्ता जमा करता आला नाही. त्यामुळे बॅंकेकडून तगादा सुरू होता. आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांचे चुलत बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर यांनी दिली.
बीड तालुक्‍यातील शिवणी येथील शेतकरी हनुमान रघुनाथ सुर्वे (32) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पिंपळने पोलिस ठाण्यात झाली आहे. चिंचवण (ता. वडवणी) येथील शेतकरी मोहन भिवाजी तांबडे (55) यांनी 14 मे रोजी विष प्राशन केले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Farmer Suicide in Jalana and Beed District