मराठवाड्यात चार शेतकरी आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

सेलू शहरातील वीटभट्टीलगतच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन वालूर येथील शेतकरी मोमीन रशीद मोमीन नूर (वय ६७) यांनी मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. नापिकी, कर्ज आणि घरखर्चाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. महम्मद गौस महम्मद नूर यांच्या माहितीवरून सेलू ठाण्यात घटनेची नोंद झाली.

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत नागासिनगी (ता. सेनगाव) येथे आत्माराम सीताराम गिते (वय ६५) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पाच एकर शेती असून दोन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतून ते अस्वस्थ होते. शेतातील झाडाला ते गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले.

तिसरी घटना जालना जिल्ह्यातील आहे. मठपिंपळगाव (ता. अंबड) येथील अल्पभूधारक शेतकरी बबन जनार्दन जिगे (वय ४२) यांनी ३१ ऑक्‍टोबरला शेतात विष प्राशन केले होते. त्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ते उपचार घेत होते. सोमवारी (ता.१२) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेचे अडीच लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आहे. 

वाळून गेलेल्या उसात घेतला गळफास 
तांदुळजा - सारसा (ता. लातूर) येथे भुजंग माणिकराव पवार (वय ५५) यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी वाळून गेलेल्या उसाच्या फडात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज काढून त्यांनी तीन एकर ऊस जोपासला. उसाच्या उत्पन्नावर त्यांनी मुलीच्या लग्नाचे नियोजन केले होते; मात्र पावसाअभावी ऊस वाळल्याने कर्जफेड, मुलीचे लग्न, घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेत ते होते. मुरूड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four farmer Suicide in Marathwada