‘डॉक्टर’ तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती...

नांदेडच्या डॉक्टर लेनमधील चार रुग्णालयांना दंड लावला.
नांदेडच्या डॉक्टर लेनमधील चार रुग्णालयांना दंड लावला.

नांदेड - सर्वसामान्य नागरिकांकडून एखादी चूक झाली तर आपण समजू शकतो. पण जेव्हा डॉक्टरच चूक करतात तेव्हा त्याला काय म्हणावे. नांदेडमध्ये देखील चुका करणारे डॉक्टर सापडले असून त्यांच्या रुग्णालयावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता इथून पुढे अशा पद्धतीने काम केले तर पुन्हा दंडासह गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील महापालिकेने दिलाय. डॉक्टरांचा हा प्रकार पाहून ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, ‘डॉक्टर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, असेच शब्द सर्वसामान्यांच्या तोंडातून बाहेर येत आहेत.
 
रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) वेगळा ठेवणे त्याचबरोबर इतर ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याच्या सूचना नांदेड महापालिकेच्या स्वच्छता विभागाने केल्या आहेत. त्याचबरोबर त्याची सवय शहरातील रुग्णालयांना लागावी, यासाठी त्याची पाहणीही सुरु केली आहे. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील सवय लागावी यासाठी रुग्णालयांना भेट देऊन सूचना केल्या आहेत. तरी देखील काही रुग्णालयांकडून त्याचे पालन होत नाही. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी आढावा बैठक घेऊन त्यात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

महापालिकेतर्फे तपासणी मोहिम
त्यानुसार स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादेक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ही कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये वाडिया फॅक्ट्री, डॉक्टर लाईनमध्ये सहायक आयुक्त राजेश चव्हाण, स्वच्छता निरीक्षक किशन तारू, जिलानी पाशा, एस. पी. पाशमवाड, राजेश कऱ्हाळे, संतोष पवळे व इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयांची पाहणी केली. 

चार रुग्णालयांना दंड
बायोमेडिकल वेस्ट, ओला व सुका कचरा यासाठी तीन वेगवेगळ्या रंगांच्या डस्टबीन ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तरी देखील त्या पद्धतीने काम होत नव्हते. एकत्रित व अस्ताव्यस्त कचरा पडलेला दिसला. त्यामुळे रेंगे हॉस्पिटलला दहा हजार रुपये, कळंबकर हॉस्पिटलला पाच हजार, निरायम बाल रुग्णालयास पाच हजार आणि आधार हॉस्पिटलला पाच हजार, असा २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या चार दवाखान्यांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनाही समज देण्यात आली. 

तर होणार दंड...
रुग्णालयांनी दैनंदिन निर्माण होणारा जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ठेवावा. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या डस्टबीन वापराव्यात. महापालिकेच्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावा. महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेकडेच जैविक कचरा सुपूर्द करावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कचरा टाकू नये. अन्यथा घनकचरा व्यवस्थापन नियम - २०१६ व बायोमेडीकल वेस्ट हॅन्डलिंग रुल्स - १९९८ मधील तरतुदीनुसार संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 
- गुलाम सादेक, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com