बीड - भरधाव कार रोहित्रावर धडकून चार ठार 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

गेवराई (जि. बीड) - भरधाव वेगातील कार वीज रोहित्रावर धडकल्यानंतर रोहित्र कारवर आदळले. या अपघातात कारमधील चौघे ठार झाल्याची घटना कल्याण-विशाखा पट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील तांदळा येथील गवते वस्तीवर मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री घडली. 

गेवराई (जि. बीड) - भरधाव वेगातील कार वीज रोहित्रावर धडकल्यानंतर रोहित्र कारवर आदळले. या अपघातात कारमधील चौघे ठार झाल्याची घटना कल्याण-विशाखा पट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील तांदळा येथील गवते वस्तीवर मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री घडली. 

अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने वस्तीवरील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढले. गणेश मोहन सिरसट (वय २२, रा. फावडेवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर), विजय श्रीरंग नागरगोजे (वय ३८, रा. नागदरा, ता. परळी), गोविंद गंगाधर नागरगोजे (वय १९, रा. मलवटी रोड, लातूर), रिजवान आयुबखान पठाण (२२, सुगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

वरील चौघे मंगळवारी रात्री कारने (एमएच-२४ व्ही ९९२९) परळी तालुक्यातून पाथर्डीकडे जात होते. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील तांदळा येथील गवते वस्तीजवळ त्यांची भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजवितरण कंपनीच्या रोहित्रावर जाऊन धडकली. भरधाव वेगामुळे लोखंडी खांब वाकून वजनदार रोहित्र कारवर कोसळले. यावेळी कारमधील दोघे जण त्याखाली दबले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने वस्तीवरील लोकांनी कारमधील सर्वांना बाहेर काढले. उपचारासाठी नेत असताना वाटेत एकाचा मृत्यू झाला. तर, अन्य एकाचा मृत्यू रुग्णालयात पोचल्यानंतर झाला. चकलांबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four killed in car accident