चार हजार डॉक्टर तातडीने उपलब्ध करून देणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण, तसेच इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्य:स्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून, सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

लातूर : महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण, तसेच इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्य:स्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून, सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

उकाड्याने त्रस्त लातूरकरांना पावसामुळे दिलासा, आंब्याचे मोठे नुकसान

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०१९ मध्ये घोषित करण्यात आला होता. यात सुमारे चार हजार विद्यार्थी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप एक मार्च २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटर्नशिप पूर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान समारंभाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पदवी प्रदान समारंभाची वाट न पाहता या विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत. सद्य:स्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

उंबरठा ओलांडला नाही तरी कोरोनाची लागण, कोरोनाबाधित रुग्णाने मांडली व्यथा

भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्टना दोन लाख मानधन
महाराष्ट्रात विशेषतः बृहन्मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची आवश्यकता असल्याने त्यांना कोविड कालावधीसाठी मानधन तत्त्वावर घेण्यात येणार आहे. ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले डॉक्टर, ज्यांना कुठलाही आजार नाही, इंटर्नशिप पूर्ण केलेले; तसेच रजिस्ट्रेशन केलेल्या डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा ८० हजार रुपये मानधन दिले जाईल. डॉक्टरांप्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्त्वावर घेण्यात येणार आहे.

भूलतज्ज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्त्वावर घेण्यात येणार आहे. ज्यांनी बी.एसस्सी. किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे. ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्यांना दरमहा ३० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस यांना हे मानधन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे. पात्र डॉक्टरांनी https://forms.gle/PtCY३SvhvEA४३WxV६ या साइटवर, तर पात्र नर्सेस यांनी https://forms.gle/८१LcWWajq१WNQ६cK८ या साइटवर अर्ज करावेत, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Thousand Doctors Will Be Available, Minister Decision