चौदा हजार शेतकरी आधार प्रमाणिकरणापासून लांब, कर्जमुक्ती योजनेतून १ हजार ३९६ कोटी खात्यात जमा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

बीड जिल्ह्यात अद्याप १३ हजार ९९७ शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

बीड : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून दोन लाख २७ हजार ७१५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर १,३९६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मात्र, अद्याप १३ हजार ९९७ शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही. अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्येक्षतेखाली तक्रार निवारण समितीकडे ३७९३ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, १७३४ तक्रारी प्रलंबित आहेत. तहसीलदारांच्या तालुकास्तरीय समितीकडे २५६४ शेतकऱ्यांच्या तक्रारींपैकी ८३२ तक्रारी प्रलंबित आहेत. दरम्यान, आतापर्यंत २,२७,७१५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीच्या लाभाची १३९६ कोटी ५९ कोटी जमा झालेली आहे.

‘आरोग्या’तही सहा महिने थांब! भरतीची प्रक्रिया सात महिन्यांपासून थंडच

सदर योजना आधारकार्डशी संलग्न असून, अद्याप ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या ठिकाणी मूळ आधार कार्ड व बँक खात्याचे पासबुकसह उपस्थित राहून अंगठ्याचा ठसा उमटवून प्रमाणीकरण पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रचालकास त्याच्या बोटाचा ठसा वापरून आधार प्रमाणीकरण करण्याची विनंती करावी.

त्यानंतर त्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुकास्तरीय समिती यांच्याकडे स्वत: उपस्थित राहून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक चुकीचे आहेत त्यांनी त्यांच्या आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात दाखल करावी. मृत लाभार्थींच्या वारसांनी मृताच्या नावावरील कर्ज वारसाचे नावाने वर्ग करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक शाखेस संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

परिवर्तनवादी चळवळीचे नेते प्राचार्य कॉम्रेड डॉ. विठ्ठल मोरे यांचे निधन

मृत कर्जदाराच्या कर्जखात्याची वारसाची नोंद करावी
मृत लाभार्थींच्या वारसांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे अशा कायदेशीर वारसदार यांनी कर्जदार शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचे स्वसाक्षांकित प्रतीसह संबंधित तालुक्याचे उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केली नसल्यास सादर करावी. तसेच मृत शेतकऱ्याच्या कायदेशीर वारसदाराने संबंधित बँकेत जाऊन मृत कर्जदाराच्या कर्जखात्याची वारसाची नोंद करून घ्यावी. आधार प्रमाणीकरण व वारसांच्या नावे कर्ज वर्ग करण्याची कारवाई एक आठवड्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen Thousand Farmers Out Of Adhaar Standardization