मुक्त संचारामुळे लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020


कोरोना विषाणूचा संसर्ग हा एक दुसऱ्याच्या संपर्कात आल्यानेच होत असल्याने लॉकडाउन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद असल्याने एकीकडे कोरोनाची दहशत, तर दुसरीकडे उपाशी मरण्याची भीती, यामुळे इतरत्र कामासाठी गेलेले नागरिक मिळेल त्या वाहनाने गावचा रस्ता धरत आहेत.

नायगाव, (जि.नांदेड) ः कोरोना व लॉकडाउनमुळे पुणे, मुंबई, दिल्ली, राजस्थानसह विदेशातून पाच हजार ५३५ नागरिक घरवापसी झाले आहेत. नायगाव तालुक्यातील या नागरिकांवर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकेच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत असली तरी होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेले नागरिक बिनबोभाट गावात फिरत आहेत.

मिळेल त्या वाहनाने गावचा रस्ता
कोरोना विषाणूचा संसर्ग हा एक दुसऱ्याच्या संपर्कात आल्यानेच होत असल्याने लॉकडाउन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद असल्याने एकीकडे कोरोनाची दहशत, तर दुसरीकडे उपाशी मरण्याची भीती, यामुळे इतरत्र कामासाठी गेलेले नागरिक मिळेल त्या वाहनाने गावचा रस्ता धरत आहेत. नायगाव तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या शहरात कामासाठी व नौकरीच्या निमित्ताने राहात होते. परंतु, या परिस्थितीमुळे आपापल्या गावाकडे जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे आजपर्यंत नायगाव तालुक्यात पुणे, मुंबई, दिल्ली, यवतमाळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिदर व विदेशातून पाच हजार ५३५ नागरिकांनी घरवापसी केली आहे. यात तिघे विदेशातून आलेले असून ते गडगा, राहेर व कुष्णूर येथील आहेत.

अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून माहीती
बाहेरून आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडून काटेकोरपणे नोंद घेण्यात येत असून होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेल्या नागरिकांना घराच्या बाहेर न निघण्याच्याही कडक सूचना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाची नजर चुकवून गावात नवीन कुणी आले आहे का? याचीही माहिती आशा वर्कर व अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. शासन आणि आरोग्य विभाग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी काळजी घेत असताना नायगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना कारोनाबाबत काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

मोकाट फिरणे बंद करा 
लॉकडाउन करून संचारबंदी लागू करण्यात आली. याला आठ दिवस झाले असली तरी शहरातील मुख्य रस्ते वगळता गल्लीबोळांत याचा काहीही परिणाम दिसत नाही. टवाळखोर मुख्य ठिकाणी बसून गुटख्याच्या पिचकाऱ्या मारत आहेत. खेड्यात तर चावडीवर, घरांसमोरील ओट्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी दहा ते १५ जण एकत्र जमून कोरोना विषाणूबाबत देश-विदेशात काय चाललयं यावर गप्पा करत असताना आपण एकत्र आल्याने आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, याची जाणीवच नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाहेरून आलेल्यांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारण्यात आलेलेही सहभागी असल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा -  लॉकडाउनचा रेशीम उत्‍पादकांना फटका

सूचनांचे पालन करावे
होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेले नागरिक घरी आहेत का बाहेर गेलेत, हे पाहण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका लक्ष ठेवून असताना काही जण तंबाखू व गुटख्यासाठी गावभर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेर काम करणारे तब्बल साडेपाच हजारांच्या वर नागरिक आपापल्या गावी आले असून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता सार्वजनिक ठिकाणी वावरण्याबरोबरच मोकाट फिरत असल्याने भविष्यात कोणते संकट ओढावणार याची कल्पनाच न केलेली बरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free communication triggers lockdown purpose, nanded news