esakal | इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट; उत्पादन खर्चात होणार वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

farm

इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट; उत्पादन खर्चात होणार वाढ

sakal_logo
By
केतन ढवन

उजनी (लातूर): परिसरातील शेतकरी खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागत (kharif cultivation) करण्यामध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीच्या (fuel price hike) रूपाने येथील शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल का नाही याची शाश्वती नसताना उत्पादन खर्चात मात्र हमखास वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी पडल्या. तेव्हापासून येथील पेरणी पूर्व मशागतींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. परिसरातील शेतकरी कृषी केंद्रावर खत, बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

कोरोना रुग्ण संख्या तात्पुरती आटोक्यात आली असली तरी संकट कायम असल्याचे आरोग्य विभाग सांगते. या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांना इंधन दरवाढीसारखा महत्त्वपूर्ण प्रश्न भेडसावत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शेतातील जवळपास सगळीच मशागतीचे कामे ट्रॅक्टरवर करून घेतली जात असून, त्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या दराने मात्र शंभरी गाठली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करण्यासाठी एकरी आकारण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीच्या रूपाने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

हेही वाचा: Coronavirus| लातूरचा ‘ऑक्सिजन पॅटर्न’ आता राज्यात

दरम्यान, केंद्र शासनाने नुकत्याच आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी सुधारित किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. त्यापैकी येथील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसाठी प्रति क्विंटल एमएसपी दरामध्ये नाममात्र ७० रुपये वाढ करण्यात आली आहे. येथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ आणि त्या तुलनेत एमएसपी दरांमध्ये केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. यामुळे उत्पन्न आणि त्यासाठी लागणारा खर्च यांचा ताळमेळ घालणे कठीण आहे. या चिंतेत येथील शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

असा वाढला खर्च-
मशागत - जुने दर - नवीन दर
रोटर - १००० - १२०० रुपये
पंजी - ६०० - ७०० रुपये
पाळी - ५०० - ७०० रुपये
नांगरणी - १२०० - १८०० रुपये
लोकल मालवाहतूक - ५०० - १००० रुपये
पेरणी - ६०० - ८०० रुपये