esakal | Coronavirus| लातूरचा ‘ऑक्सिजन पॅटर्न’ आता राज्यात
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen

Coronavirus| लातूरचा ‘ऑक्सिजन पॅटर्न’ आता राज्यात

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर: येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयाने कोरोनाकाळात ऑक्सिजन साठवणूक व बचतीचा उपक्रम राबविला. त्यामुळे अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात या संस्थेला यश आले. संस्थेच्या या ऑक्सिजन पॅटर्नची आता राज्यपातळीवर दखल घेण्यात आली आहे. हा पॅटर्न राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने राबवावा, असे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालकांनी संबंधितांना दिले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचार पटीने वाढली होती. त्यात गंभीर रुग्ण अधिक होते. दीडशे आयसीयू बेड होते; पण या संस्थेने पुढे येणाऱ्या समस्या व धोके ओळखून आधीच ऑक्सिजनचे तीन प्लॅंट उभे केले. यात अकरा किलोलिटर क्षमतेचे दोन तर सहा किलोलिटर क्षमतेचा एका प्लॅंटचा समावेश आहे. यातून पाचशे ते सहाशे ऑक्सिजन सिलिंडर वेळोवेळी भरून मिळत राहिले. योग्य नियोजन करण्यात आले. त्यामुळे रुग्णसेवेत ऑक्सिजनचा तुटवडा कधीही भासला नाही.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

योग्य नियोजनातून बचतीवर भर-
संस्थेने वाया जाणाऱ्या ऑक्सिजनच्या वाटा बंद केल्या. रुग्णांना ऑक्सिजन योग्य प्रमाणात देणे, सातत्याने आवश्यक तेवढाच ऑक्सिजन देणे, रुग्णाच्या जेवणाच्या वेळी किंवा बाथरूमला गेल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा बंद ठेवणे, ऑक्सिजनच्या पाइपलाइनची वेळोवेळी तपासणी करून गळती आढळल्यास तातडीने बंद करणे, वाहनातील टँकमध्ये ऑक्सिजन भरताना कधीही गळती होऊ न देणे आदींवर भर देण्यात आला. त्यातून ऑक्सिजनची बचत केली गेली. इतर वैद्यकीय महाविद्यालयात सहाशे रुग्णांसाठी सुमारे २० ते २२ किलोलिटर ऑक्सिजनचा वापर करण्यात येत होता. संस्थेच्या या रुग्णालयात आठ ते दहा किलोलिटर ऑक्सिजनवर ५५० रुग्णांवर उपचार केले गेले. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची बचतही या संस्थेने केली.

कौतुक अन् आदेश
संस्थेने ऑक्सिजनसंदर्भात केलेल्या कामाचे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय यांनी कौतुक केले. इतकेच नव्हे तर या संस्थेने ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याचे दिसले. त्यामुळे या संस्थेने केलेल्या उपाययोजना राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी तातडीने राबवाव्यात, असे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचे सहसंचालकांनी दिले आहेत.

हेही वाचा: UEFA Euro 2020: यूरोपीय फुटबॉल चॅम्पियनशीपसाठी Googleचे खास Doodle

ऑक्सिजनचा अपव्यय टाळून बचतीवर भर दिला. त्यामुळे गरजूंना तो मुबलक देता आला. आता या प्रयत्नांची दखल राज्यपातळीवर घेतली गेली आहे, त्याचे समाधान आहे.
- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर.