esakal | लातुरात साधेपणाने होणार बप्पाचे आगमन, महापालिकेकडून निर्बंध
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Ganesh Festival.jpg

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे; पण हा उत्सव साजरा केला जाणार आहे. पण यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. लातूर शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी सार्वजनिकरीत्या हा उत्सव साजरा न करण्याचाच निर्णय घेतला आहे.

लातुरात साधेपणाने होणार बप्पाचे आगमन, महापालिकेकडून निर्बंध

sakal_logo
By
हरि तुगावकर

लातूर : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. पण हा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी सार्वजनिकरीत्या हा उत्सव साजरा न करण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे एखाद्या मंदिरात, पदाधिकाऱ्यांच्या घरातच यावर्षी गणरायाची स्थापना केली जाणार आहे. यावर्षी अत्यंत साधेपणाने हा गणेशोत्सव साजरा होणार आहे.


शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथे बैठक झाली. हा उत्सव साजरा होत असताना सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. रस्त्यावर मंडप टाकण्याऐवजी एखाद्या मंदिरात किंवा पदाधिकाऱ्यांच्या घरीच गणरायाची स्थापना करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी गर्दी एकत्र करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

वाचा : कर्मचाऱ्याने रुमालात दगडं बांधून आणले अन् दवाखान्यात डाॅक्टरवर केला हल्ला, पण...

दरम्यान, महापालिकेच्या वतीने गणेशमुर्ती विक्री करणाऱ्यांसाठी काही निर्बंध घातले गेले आहेत. तसे आदेश मंगळवारी सहायक आयुक्त सुंदर बोंदर यांनी काढले आहेत. यात गणेशमूर्ती विक्रीची ठिकाणे जाहीर करण्यात आली असून, गणेशमूर्ती विक्री करताना काय काळजी घ्यायची या संदर्भातही आवाहन करण्यात आले आहे. कोठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.


गणेशमूर्ती विक्रीची ठिकाणे
-दयानंद महाविद्यालयाचा कॅम्पस
-नवीन बसस्थानक, अंबाजोगाई रोड
-ग्रीन बेल्ट, हिरोहोंडा शोरूम मागे
-भगवान विद्यालय, रिंगरोड
-राजस्थान विद्यालय कॅम्पस
-ग्रीन बेल्ट, आदर्श कॉलनी
-बिडवे लॉन्स, औसा रस्ता
-टाऊन हॉल मैदान
-दसरा पार्क मैदान, नांदेड रोड
-रेल्वे पार्किंग, गुळमार्केट
-सिद्धेश्वर मंदिर परिसर
-व्यंकटेश विद्यालय, झिंगणप्पा गल्ली
-यशवंत विद्यालय, नांदेड रोड
-गोदावरी शाळा, दयाराम रोड

हेही वाचा : सततच्या पावसामुळे ऊस आडवे, मूग पाण्यात तर सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव

विक्रेत्यांसाठी अटी
-गंजगोलाई, सुभाष चौकात गणेश मुर्ती विक्रीस बंदी
-सार्वजनिक गणेश मंडळासाठी चार फूट व घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी
-विक्रेत्यांनी मास्क आणि फेसशिल्डचा वापर बंधनकारक, सॅनिटायझर, हॅण्डवॉश ठेवा
-शारीरिक अंतर पाळण्यासाठी सहा फूट अंतर ठेवून पांढऱ्या चुनामातीमध्ये बॉक्स करा
-१८ वर्षांपेक्षा कमी व ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला कामावर ठेवू नये
-एखाद्याला कोरोनाचे लक्षण दिसताच महापालिकेला कळवा.


जिल्ह्यात सोमवारपर्यंत केवळ १३ सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. ही संख्या वाढू शकते; पण यावर्षी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी मर्यादित उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक उपक्रम घेण्यावर भर द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मूर्तीला मागणीच नाही. यावर्षी लहानच मूर्तींवर भर राहिला आहे; पण सार्वजनिक गणेश मंडळातही फारसा उत्साह दिसून येत नाही. त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आहे.
- उमेश सोनवळकर, अध्यक्ष, लातूर जिल्हा मूर्तीकार संघटना.

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top