esakal | गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले, एक पिस्टल जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

PRB

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना गुरुवारी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्टल व एक लाख तीन हजार चारशे रुपये जप्त केले. 

गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले, एक पिस्टल जप्त 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना गुरुवारी (ता.चार) मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्टल व एक लाख तीन हजार चारशे रुपये जप्त केले. 

गंगाखेड येथील व्यापारी अनिल यानपल्लेवार हे दुकान बंदकरून घरी जात असताना तिघा जणांनी मंगळवारी (ता.दोन) रात्री साडेनऊ वाजता त्यांना रस्त्यात थांबवुन त्यांच्याजवळील पैश्यांची बॅग लांबवली होती. तब्बल एक लाख ९५ हजार ५०० रुपये चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - परभणी मेडीकल कॉलेजसाठी जमिन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

दोन पथके गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ रवाना 
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी फौजदार साईनाथ पुयड, हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, किशोर चव्हाण, अजहर शेख, हरिचंद्र खुपसे, शेख मोबीन, संतोश सानप, छगन सोनवणे, संजय घुगे, पिराजी निळे यांची दोन पथके गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ रवाना केली. या पथकास सायबर शेखेचे सहायक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांनी मदत केली. आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपींनी गंगाखेडात गुन्हा केल्यानंतर तुळजापूर येथील एका धाब्यावर त्यांच्याजवळील बंदुकीतून फायरिंग केली होती. याबाबत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील एक आरोपी उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतला असून अन्य आरोपींच्या शोधात ते होते. 

हेही वाचा - खुशखबर...! परभणीसाठी दुसरे एक बसस्थानक मिळणार

वापरलेली स्कुटी देखील जप्त केली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी हे पुणे येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ पुण्याकडे रवाना झाले. यातील आरोपी अर्जुन नागनाथ बडवणे, किशोर विठ्ठलराव भोसले व साहील सुदंरराव उर्फ राजेश जाधव (तिघेही रा. (रा. खडकपुरा गल्ली गंगाखेड, जि. परभणी) यांना ताह्यात घेऊन त्यांच्याकडून फायर केलेली पिस्टल तसेच गु्ह्यातील मालापैकी एक लाख तीन हजार ४०० रुपये आणि मोबाईल असा एकूण दोन लाख आठ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कुटी देखील जप्त केली. या गुन्ह्यात अजुन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तपास गंगाखेड पोलिस ठाण्यातील फौजदार विठ्ठल घोगरे हे करीत आहेत.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image