पूर्णेत स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर पेटले, सतर्कतेमुळे अनर्थ टळला 

gas
gas

पूर्णा ः साळुबाई गल्लीतील स्वयंपाकखोलीत असलेल्या सिलिंडरने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी (ता.आठ) सकाळी घडली. परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे व नगर परिषद अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. 

सुभाष सैदमवार यांच्या स्वयंपाकखोलीतील गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे त्यांच्या मुलास दिसून आले. त्याने आरडाओरडा केल्यावर परिसरातील सचिन ऊर्फ पप्पू कदम, गजानन ठाकूर, गुरुराज यशके, गजानन हेसे, विलास साबणे, बाळू पाथरकर आदी मदतीसाठी धाऊन आले. त्यांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. 


नागरिक घटनेमुळे घाबरले 
अग्निशमन दलाचे अमजद कुरेशी, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत गॅस सिलिंडरने स्वयंपाकघरातील अन्नधान्य, फ्रीज, कपडे, भांडे आदी सामग्रीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम स्फोट होऊ नये म्हणून सिलिंडरला लागलेली आग कौशल्याने आटोक्यात आणली. त्यानंतर बाकी आग विझवली. दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिक या घटनेमुळे घाबरले होते. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले. भविष्यात घरातील गॅस सिलिंडर पेटले तर ती आग तत्काळ कशी आटोक्यात आणायची यासाठी आपण शहरातील विविध गल्लीतील नागरिकांना प्रशिक्षण देणार आहोत. ती आग आटोक्यात आणण्यासाठी ओला मोठा कपडा, ध्यैर्य व कौशल्य आवश्यक आहे. असे स्वयंसेवक प्रत्येक प्रभागात तयार झाले तर मोठा अनर्थ टळू शकतो, असे अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनचे जवान दीपक गवळी यांनी सांगितले. 

पोलिसाविरुद्ध महिलेच्या खुनाचा गुन्हा 
परभणी ः महिलेच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी (ता.सात) रात्री पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. येथील सागर कॉलनीतील रमाबाई विठ्ठल सदावर्ते या मंगळवारी रात्री आठच्या सुमारास काही कागदपत्रे सोबत घेऊन घराबाहेर पडल्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. बुधवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातून फोन आल्यावर घरातील सर्वजण रुग्णालयात पोचले. तिथे रमाबाई यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. संतापलेल्या नातेवाइकांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध संशय व्यक्त केला. रमाबाई सदावर्ते यांची मुलगी साक्षी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस कर्मचारी संतोष जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड तपास करीत आहेत. 


पाथरीत मटक्यावर धाड, साहित्य जप्त 
पाथरी ः मुंबई-कल्याण मटका घेताना पाथरी पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दहा हजार ५९० रुपये, मटक्याच्या चिठ्या आणि चार आरोपींना ताब्यात घेतल्याची कारवाई (ता.सात) रोजी रात्री नऊच्या सुमारास शहरातील फाकराबाद मोहल्ला भागात केली. पाथरी शहरात मागील काही महिण्यात कल्याण-मुंबई मटका जुगाराने चांगलेच डोकेवर काढले आहे. (ता.सात) रोजी पाथरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून रात्री नऊच्या सुमारास पोलिस निरीक्षक बी.आर.तीपलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक टोपाजी कोरके, कॉन्स्टेबल रमेश मुंडे, बी.एम.बर्गे यांच्या पथकाने फाकराबद मोहल्ला भागात धाड टाकली. या वेळी शेख बशीर शेख युसूफ, मोहमद मोईज मोहमद जमीर आणि सयद रहीज सयद हुसेन यांच्याकडे मटक्याचे साहित्य आणि नगदी रोकड चार हजार ३५० रुपये जप्त करण्यात आले. त्या नंतर मटका कोणाच्या सांगण्यावरून घेत असल्याची माहिती आरोपीकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी अजीज मोहल्ला येथील खलील खान फतेयाब खान यांच्याकडून सहा हजार २४० नगद रक्कम आणि मटक्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करून चारही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. कॉन्स्टेबल रमेश मुंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कॉन्स्टेबल शाम काळे करत आहेत. 

खळी पुलावरून वृद्धाने मारली उडी  
गंगाखेड ः गंगाखेड - परभणी रस्यावरील गोदावरी नदीवर असलेल्या खळी पुलावरून एका वृद्धाने उडी मारल्याची घटना गुरुवारी (ता.आठ) रोजी घडली. सोनपेठ तालुक्यातील शिरसी बुद्रुक येथील रहिवासी केरबा लिंगोजी कोठेवाढ हे गंगाखेड तालुक्यातील खळी पुलावर (ता.आठ) रोजी दुपारी बाराच्या सुमारास आले. त्यांनी खिशातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक, रुमाल व पटका पुलावर काढून ठेवत गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. सायंकाळी उशिरापर्यंत गोदावरी नदीपात्रात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता.  

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com