‘नको आवाज देऊ तू, आता कोमात आहे मी’

0poetry_festival
0poetry_festival

जालना : भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद, शाखा जालना व मराठी विभाग, जेईएस महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केलेल्या ऑनलाइन त्रैभाषिक गझल मुशायरात एकापेक्षा एक गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.


कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या भावनिकतेचे चित्रण गझलेतून उमटले. कोरोनाच्या सावटामुळे सदरील कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने; परंतु मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मुशायऱ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘जेईएस’चे प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, डॉ. यशवंत सोनुने, डॉ. राज रणधीर, डॉ. शिवाजी हुसे, डॉ. के. जी. सोनकांबळे यांची उपस्थिती होती.

या मुशायऱ्याचा प्रारंभ परभणी येथील प्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांनी सादर केलेल्या ‘मरणाच्या दारात उभा माणूस तरीही तू मोठा, की मी मोठा हे ठरवत आहे’ असे म्हणून मानवी स्वभावाचे प्रत्ययकारी दर्शन घडविले. तर आजच्या जागतिक महामारीच्या काळात देशातील मूलभूत प्रश्नांना बगल देत मीडियाने चालवलेली जनतेची दिशाभूल, तसेच विविध संदर्भांनी आपल्या खास शैलीतून त्यांनी पुढील गझल सादर केली-
‘पुरावे तिचे सापडू लागले मला उत्खनन आवडू लागले,
मढ्याने जसे मुरमुरे पाहिले रिते पोट त्याचे रडू लागले,
खड्यांना जरा काय गोंजारले मला आंधळे पारखू लागले.’
असे म्हणत त्यांनी रसिक श्रोत्यांची भरभरून दाद मिळविली. मुंबई येथील गझलकार राधिका प्रेमसंस्कार यांनी आत्मसंवाद साधणारी,
काहीशी शृंगारिक रचना सादर करताना मैफिलीत प्रेमरंगाची उधळण केली-
‘नको आवाज देऊ तू, आता कोमात आहे मी,
जगाच्या सोड माझ्याही कुठे ध्यानात आहे’ अशी गझल सादर केली.
सिल्लोड येथील गझलकार पवन ठाकूर यांच्या रचनेने अंतर्मुख केले.
‘के दो दिन की जिंदगी है, क्या तेरा है, क्या मेरा है, तेरा मेरा करते करते मर रहा है’
हा शेर सादर करीत मुशायऱ्यातून मानवतेचा, एकतेचा संदेश दिला.
मुंबई येथील प्रसिद्ध कवी प्रशांत वैद्य यांनी मुशायऱ्यात रंग भरीत-
‘तुझ्या प्रत्येक अश्रूचा मला निचरा हवा आहे,
जिवाला घोर लागावा असा मिसरा हवा आहे.
लुटावे रान ओले की फुले बागेत वेचावे,
तिला वेणी हवी आहे, तिला गजरा हवा आहे.’
ही रचना श्रोत्यांची वाहवा मिळवून गेली.
सदरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे फेसबुक पेज; तसेच कॅम्पस कट्टाचे फेसबुक पेज आणि जेईएस महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरून करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाचा महाराष्ट्रासह देशभरातील जवळपास चार हजारपेक्षा अधिक रसिक श्रोत्यांनी आस्वाद घेतला.


यावेळी कार्यक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे, परिषदेच्या जालना शाखेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ, पदाधिकारी डॉ. ज्योती धर्माधिकारी, प्रा. बसवराज कोरे, डॉ. के. जी. सोनकांबळे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. कैलास अंभुरे, प्रा. अशोक खेडकर, प्रा. बाबासाहेब वाघ, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. उमेश मुंढे, डॉ. गोवर्धन मुळक यांची उपस्थित होती. ऑनलाइन कार्यक्रमाच्या प्रक्षेपणासाठी तंत्रसाह्य प्रा. श्रीनिवास सैंदर यांनी केले. डॉ. सुनील राजपूत यांनी आपल्या कॅम्पस कट्टा डॉट कॉम फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण केले. या शानदार मुशायराचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध गझलकार व परिषदेचे जालना शाखाध्यक्ष डॉ. राज रणधीर यांनी केले. परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ. एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.


शम्स जालनवी यांना आदरांजली
भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे यांनी आपल्या मनोगतातून मराठवाड्याच्या मातीतील गझल प्रांताचे वेगळेपण जपत ही चळवळ परिषदेतर्फे कायम ठेवण्याचा सतत प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन केले. यानिमित्ताने नुकतेच दिवंगत झालेले ख्यातनाम उर्दू गझलकार शम्स जालनवी यांच्या आवाजातील गझल प्रसारित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com