इंटरेस्टिंग! अंबाजोगाईत मुलींनी उभारली ज्ञानाची गुढी

Beed News
Beed News

अंबाजोगाई : गुढी पाडव्याला घरोघरी दर वर्षी पारंपारिक गुढी उभारून मराठी वर्षाचे स्वागत केले जाते. परंतु यंदा राज्यात पाडव्याच्या सणातच कोरोनाचे संकट सर्वत्र ओढावलेले आहे. त्याला थोपवण्यासाठी सर्व डाॅक्टर्स आपापल्या ज्ञानाच्या बळावरच कोरोनाच्या या संकटातून लोकांचे जीव वाचवत आहेत. ते पुस्तकातील ज्ञानामुळेच. त्यामुळे शिंदे परिवारातील स्वरा व आर्द्रा या दोघींनी आपल्या कल्पनेतून ही ज्ञानाची गुढी उभारली.

गुढी पाडवा बुधवारी (ता. २५) सर्वत्र साजरा झाला. परंतु कोरोनामुळे सर्वत्र संचार बंदी, बाहेरही जाता येत नाही, अशी स्थिती होती. हे सर्व आपल्यासाठीच आहे. त्यामुळे सर्वजण घरातच राहून काळजी घेत आहेत. शहरातील राहुल व ज्योती शिंदे यांच्या परिवाराचा गुढीपाडवा हा सण गावाकडेच (घाटनांदूर) येथे एकत्र साजरा होतो. परंतु संचारबंदीमुळे गावाकडे जाणे अडचणीचे होते. याची चर्चा घरात सर्व भावंडात व महिलांत सुरू होती. त्याचवेळी स्वरा व आर्द्रा या दोघी घरातील सर्व पुस्तके एकत्र करून जुळवा, जुळव करत होत्या.

''या पोरी काय करत आहेत, सगळा पुस्तकांचा राडा करून टाकला गडे यांनी,'' असे म्हणत, त्यांची आई (ज्योती) मुलींना बोलू लागली. तेवढ्यात स्वरा आपल्या आईला म्हणाली, ''आगं आई, आम्ही खुप चांगली गुढी करत आहोत, तू थांब आम्ही सगळं सांगतो.'' आणि थोडक्यात संकल्पना सांगितल्यानंतर या मुलींचे पप्पा राहुल शिंदे यांनीही त्यांना सर्व ग्रंथ व पुस्तके रचन्यास मदत करू लागले. 

बघता, बघता १०२ पुस्तकांची ही गुढी उभारली. आता या गुढीला शेला (शाल) कुठला घालायचा हा प्रश्न होता. तेंव्हा मुलीच्या आईने मराठवाडा साहित्य संमेलनाच्या सत्कारात मिळालेला शेला या ज्ञानाच्या गुढीला घालण्यास दिला. त्यातच स्वरा आणि आर्द्राची संकल्पना साकार झाली. त्यानंतर या मुलींनी ही संकल्पना कशी सुचली, याची माहिती आई, वडिलांना दिली.

या पुस्तकांचा समावेश

या गुढीत जी १०२ पुस्तके रचली, त्यात रस्किन बाॅंड यांची पुस्तकं, कोसला, बखरी, तुकाराम गाथा, तेंडुलकरांच्या निवडक कथांचा संग्रह, बोरी बाभळी, ही नामवंत लेखकांची विविध पुस्तके व लहान मुलांच्या विविध कथांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

अशी सुचली कल्पना 

स्वरा म्हणाली, ''आई, वडील गावाकडे गुढी पाडव्यासाठी गावाकडे जायची चर्चा करीत होते. परंतु संचारबंदीच्या अडचणींमुळे जाता येत नसल्याचे कळताच ही ज्ञानाची गुढी उभारण्याची कल्पना सुचली. सर्वत्र कोरोनाच्या आजाराचे संकट व त्यावर औषध नसल्याचे ऐकत आहोत, तरीही अनेकांना या आजारातून वाचवण्यात डॉक्टरांना यश येत आहे. हे ज्ञान त्यांना पुस्तकातूनच मिळाले ना त्यामुळे पुस्तके किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात आले त्यातूनच ही ज्ञानाची गुढी उभारण्याची कल्पना सुचली.''

स्वरा ही इयत्ता चौथी व आर्द्रा ही तिसरी मध्ये शिकतात. या दोघीही शहरातील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेत आहेत. त्या दोघींनाही पुस्तक वाचन व संगिताची आवड आहे. अभिजीत जोंधळे यांच्या अनुराग वाचनालयात गेल्यानंतर वाचनीय पुस्तके निवडून त्या आणतात, असे त्यांची आई शिक्षिका ज्योती शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com