Godavari दुथडी वाहतेय गोदावरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari river

Godavari : दुथडी वाहतेय गोदावरी

शहागड : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता गोदावरी नदीत शुक्रवारी नाथसागरातून आवक सुरू झाली. त्यामुळे पाथरवाला बुद्रुक येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे दरवाजे वर उचलून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी सध्या दुथडी वाहत आहे.

अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची भर पडत आहे. त्यातच पैठणच्या नाथसागरातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. दरम्यान, पाथरवाला बुद्रुक येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून शुक्रवारी पाणी सोडण्यात येत होते.

यात दुपारी अडीच वाजता बंधाऱ्याचे एकूण आठ दरवाजे वर उचलून ४४ हजार २६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर आवक कायम राहिल्याने शुक्रवारी रात्री आठ वाजता आणखी दोन दरवाजे वर उचलण्यात आले. त्यामुळे एकूण १० दरवाजांमधून ५५ हजार ३३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

बंधाऱ्याची पाणी पातळी 419.95 मीटर इतकी आहे. बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी वाहताना दिसत आहे. दरम्यान, गोदावरी नदीच्या काठावरील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, नदीकाठी कुणीही जाऊ नये,जनावरे चारायला नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, बंधाऱ्यावर कर्मचारी कैलास डावकर व बाबासाहेब मगरे आदी तैनात आहेत.