शरद पवारांच्या दौऱ्यात आमदार चौगुले यांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली

अविनाश काळे
Sunday, 18 October 2020

शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यात रविवारी (ता.१८) उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार घडला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यात रविवारी (ता.१८) उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार घडला. अतिवृष्टीमुळे लोहारा व उमरगा तालुक्यात झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी श्री.पवार रविवारी लोहारा तालुक्यातील सास्तुर, एकोंडी (लोहारा), राजेगाव भागात नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली.

भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता; शेतकरी म्हणाले, साहेब आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे

यावेळी सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिघेगावकर, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार राहुल मोटे, उपविभागीय अधिकारी विठ्ठलराव उदमले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, सक्षणा सलगर, किरण गायकवाड आदींची उपस्थिती होती.

उमरगा शहरात रविवारी दुपारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्या घरी थांबून दुपारी अडीचच्या सुमारास उमरगा तालुक्यातील कवठा येथे नुकसानग्रस्त पिकाची पाहणीसाठी रवाना झाले. दरम्यान सास्तूर व राजेगाव दौऱ्यात बरीच गर्दी होती. आमदार चौगुले यांच्या गळ्यातील सोनसाखळीवर चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत आमदार चौगुले यांना विचारले असता त्यांनी सोन्याची साखळी हरवल्याची माहिती सांगितली. मात्र याचा पोलीस तपास करीत असल्याने चोरट्यांनी डल्ला मारल्याची चर्चा सुरू होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Chain Of MLA Chaugule Stolen During Damaged Crops Inspection