रब्बी हंगाम बहरणार !

कैलास चव्हाण
शनिवार, 14 डिसेंबर 2019

जायकवाडी धरणातून १५ डिसेंबरपासून डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाहिली पाणी पाळी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ परभणीसह जालना व नांदेड जिल्ह्याला होणार आहे.
 

परभणी : जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी रविवारी (ता.१५) पासून पहिली पाणी पाळी सोडण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात अन्य प्रकल्पही तुडूंब असल्याने यंदा बागायती रब्बी हंगाम चांगलाच  बहरणार आहे. या पाण्याचा लाभ परभणीसह, जालना व नांदेड जिल्ह्याला होणार आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या १२२ ते २०८ किलोमीटरपर्यंतचा मुख्य कालवा आणि त्यावरील सर्व वितरण प्रणाली अधिसूचित नदी, नाल्यावरील, कालव्यावरील मंजूर उपसासिंचन लाभधारकांच्या रब्बी हंगामातील ता.१५ डिसेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल या पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.  परभणी जिल्ह्यात पाथरी, मानवत, पालम, पूर्णा, परभणी या तालुक्यात जायकवाडी धरणाचे लाभक्षेत्र आहे. तब्बल ९७ हजार हेक्‍टरवर लाभक्षेत्र आहे. तसेच माजलगाव धरणावर गंगाखेड तालुक्यात सिंचन क्षेत्र आहे.

हेही वाचा :   मराठवाड्यातील ‘या’ रुग्णालयात होणार लिवर प्रत्यारोपन

हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढणार 
 सध्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी पाणी येणार म्हणून शेतीची मशागत करत आहेत. मशागतीची कामे पूर्ण झाली असून आता बागायती गहू आणि हरभरा पेरणीची तयारीसाठी शेतकरी सज्ज आहेत. कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामातील ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आता उर्वरित बागायती क्षेत्राच्या पेरण्या ता. १५ डिसेंबरनंतर होणार आहेत. यंदा हरभरा आणि गव्हाचे क्षेत्र वाढणार आहे. 

 प्रकल्पात मुबलक साठा
अनेकांनी कपाशी बाहेर काढुन त्यावर हरबरा आणि गव्हाची  पेरणी करण्यासाठी शेत तयार केले आहे. परतीच्या पावसासह अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला आहे. अगदी सप्टेंबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरडेठाक असणारे प्रकल्प ऑक्टोबर महिण्यात तुडुंब झाले आहेत. काही प्रकल्पात मुबलक साठा निर्माण झाल्याने अनेक गावांची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.  २० दिवस अतिवृष्टी सुरु राहील्याने नदी-नाल्या वाहील्या आहेत. जमिनीत देखील ओल राहील्याने विहीरी, कुपनलिका यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे. अनेक गावात विहीरी तुडुंब भरल्या आहेत.

हेही पहा...​  शिक्षकांचे कुटुंब जातेय मोलमजुरीला

पावने दोन लाख हेक्टरवर सिंचन

जायकवाडी धरणाचे सर्वात जास्त लाभक्षेत्र हे परभणी जिल्ह्यात आहे. तब्बल ९७ हजार ४०० हेक्टर एवढे लाभ क्षेत्र आहे. तर माजलगाव धरणाचे परभणी जिल्ह्यातील ५८ हजार ३८५ हेक्टर लाभक्षेत्र आहे. येलदरी धरणाचे लाभ क्षेत्र १६ हजार १४२ हेक्‍टरवर आहे. करपरा मध्यम प्रकल्पावर १ हजार ५० हेक्टर तर मासोळी प्रकल्पावर १ हजार ३५० हेक्टर सिंचनाचे क्षेत्रआहे. तर लघु प्रकल्पावर एकुण १ हजार ४५६ हेक्टर अशी दोन्ही मिळुन ३ हजार ८५६ हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good day for Rabbi season !