आनंददायी, पाच तालुक्यात जलसंधारणाची १७१ कामे...  

राजेश दारव्हेकर 
Monday, 8 June 2020

जिल्ह्यात होणाऱ्या या कामामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमा होण्यास मदत होणार आहे. मागील वर्षीदेखील जलसंधारणाची कामे झाल्यामुळे तलाव पूर्णपणे भरले होते. त्‍यामुळे जनावरांच्या पिण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला होता. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांसून लॉकडाउन व संचारबंदी असल्याने जलसंधारणाची कामे ठप्प पडली होती. मात्र, जिल्‍हाधिकाऱ्यांनी रोजगाराचा प्रश्न लक्षात घेता संचारबंदी शिथिल केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रोजगार हमी व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली.

हिंगोली ः जिल्‍ह्यात लघुसिंचन विभागामार्फत गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव अशी कामे करण्यात आली असून आतापर्यंत १७१ कामे पूर्ण झाले आहेत. पाच तालुक्‍यांत २०१९-२० अतंर्गत जिल्‍हा परिषदेच्या लघुसिंचन व जलसंधारण विभागातर्फे जिल्‍ह्यात १७१ गावांत लघुतलाव, पाझर तलाव, सिंचन तलावांची कामे करण्यात आली. यात औंढा नागनाथ तालुक्‍यात ४०, सेनगाव ५३, कळमुनरी ३५, वसमत १८, हिंगोली २५, असे एकूण १७१ कामे पूर्ण झाल्याची माहिती जलसंधारण कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे यांनी दिली.

एप्रिलअखेर सर्व तलाव कोरडे
पावसाळ्याच्या तोंडावर जलसंधारणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लघुसिंचन विभागाने कार्यकारी अभियंता चंद्रकात वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्‍न चालविले आहेत. या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेतल्यामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले. तसेच मागील वर्षी सरासरी जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी ८७ टक्‍के पाऊस झाला होता. एप्रिलअखेर सर्व तलाव कोरडे पडले आहेत.

हेही वाचा - Video- धक्कादायक : खासगी रुग्णालयातून गर्भवतीला काढले बाहेर 

बंद योजना अडकल्या लाल फितीत
जिल्‍ह्यात सुरू असलेल्या तेवीस गाव सिद्धेश्वर व वीस गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना बंद असल्‍याने त्‍याचा हिंगोली जिल्‍ह्याला चांगलाच फटका बसला आहे. या गावात सुरू असलेल्या योजनांमुळे नवीन योजना सुरू होण्यास अडचणी आहेत. तर या बंद असलेल्या योजनादेखील लाल फितीत अडकल्या आहेत. त्‍याचा लाभ गावकऱ्यांना मिळेणासा झाला आहे.

हेही वाचा - नांदेडकरांनो बाहेर पडताय, तर मग ही घ्या त्रिसूत्री... -

वीज जोडणीअभावी पुरजळ योजना बंद
औंढा नागनाथ तालुक्‍यातील वीस गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना असून यात वीस गावांचा समावेश आहे. यात वगरवाडी, जवळा बाजार, पुरजळ, सिरलातांडा, चोंढी शहापूर, काठोडातांडा, शिरडशहापूर, वाघासिंगी, मार्डी, वाई, चोंढी रेल्‍वेस्‍टेशन, सेलू, वरतळा, पिंपराळा, कुरुंदवाडी या गावांचा समावेश आहे. तर या योजनेत असलेली औंढा, नागेशवाडी व कुरुंदा ही गावे बाहेर पडली आहेत. ही योजना वीज जोडणीअभावी बंद आहे. भविष्यात ही योजना बंद राहू नये यासाठी दीड कोटीचे सौरऊर्जा प्रोव्हिजन सुरू आहे. २०१६-२० पुरजळ योजना बंद होती. योजनेच्या दुरुस्‍तीसाठी पाच कोटी रुपये आले होते. त्यातून येथे कामे करण्यात आली. परंतु, वीज जोडणीअभावी ही योजना बंद असल्याचे औंढा पंचायत समितीतील पाणीपुरवठ्याचे शाखा अभियंता एस. जी. पवार यांनी सांगितले.

मोरवाडी २५ गाव योजनेतून केवळ आठ गावांना पाणी
कळमनुरी ः मोरवाडी २५ गाव पाणीपुरवठा योजनेमधून केवळ आठ गावांना सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेला सुरुवातीपासूनच घरघर लागल्यामुळे योजनेचे उद्दिष्ट असलेल्या बहुतांश गावांना पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री पुनर्जीवित पाणीपुरवठा योजनेमधून या योजनेची दुरुस्ती करण्यासाठीचा साडेदहा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला.तालुक्यातील मोरवाडी, धानोरा जहांगीर, वाकोडी, खापरखेडा, शिवनी खुर्द, मसोड, वारंगा मसाई, सालेगाव, सोडेगाव, चाफनाथ, सांडस, पाळोदी, शिवनी बुद्रुक, बाभळी, बेलमंडळ, नरवाडी, साळवा, कोंढुर, बाळापुर, कान्हेगाव, शेवाळा, देवजना, घोडा, येळेगाव तुकाराम, पारडी या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी २००३ मध्ये सुरू केलेली मोरवाडी २५ गाव पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली. योजना कार्यान्वित करताना चुकीच्या पद्धतीने जलवाहिनी टाकने, पाणीपुरवठ्याची थकित वीज देयके या व अनेक कारणांमुळे योजना असफल ठरली. पंचवीस गावांना पाणीपुरवठा करण्याचे योजनेचे उद्दिष्ट योजना सुरू झाल्यापासून आजमितीस काही गावे सोडल्यास पूर्ण होऊ शकले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेली ही योजना नंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे चालविण्यासाठी देण्यात आली.
या योजनेअंतर्गत असलेल्या समस्यांचा डोंगर पाहता आजमितीस केवळ मोरवाडी, धानोरा जहांगीर, नरवाडी, साळवा, बाळापुर, पारडी या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर उन्हाळ्यामध्ये माळेगाव व झरा ही दोन गावे जोडण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत या योजनेचा लाभ केवळ आठ गावांना मिळत आहे.

याबाबींसाठी मागितला निधी 
मोरवाडी पंचवीस गाव पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री पुनर्जीवित पाणीपुरवठा योजनेमधून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी योजनेअंतर्गत जलवाहिनी दुरुस्ती, जलकुंभ दुरुस्ती, वीज देयकाच्या थकित वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी वीज पंपाऐवजी सोलार यंत्रणेवर पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध व्हावी, या करिता साडेदहा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. 

 

पाच तालुक्‍यांत झाली कामे
जिल्‍ह्यात पाच तालुक्‍यांत २०१९-२० अतंर्गत जिल्‍हा परिषदेच्या लघुसिंचन व जलसंधारण विभागातर्फे जिल्‍ह्यात १७१ गावांत लघुतलाव, पाझर तलाव, सिंचन तलावांची कामे करण्यात आली. यात औंढा नागनाथ तालुक्‍यात ४०, सेनगाव ५३, कळमुनरी ३५, वसमत १८, हिंगोली २५ असा समावेश आहे.
- चंद्रकांत वाघमारे, जलसंधारण कार्यकारी अभियंता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News, 171 Water Conservation Works In Five Talukas, hingoli news