चांगली बातमी : औंढा वन विभागाच्या वनपर्यटनमध्ये फुलले सुगंधी वन, फुलपाखरु उद्यान

राजेश दारव्हेकर
Wednesday, 3 March 2021

दरम्यान औंढा नागनाथ येथील वनपर्यटन येथे विभागीय वन अधिकारी कामाजी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगंधी वन व फुलपाखरु उद्यान फुलविण्यात आले

हिंगोली : औंढा नागनाथ येथील वनविभागाच्या वतीने गोकर्णेश्वर माळरान परिसरात तयार करण्यात आलेल्या वन पर्यटनमध्ये सुगंधी वन व फुलपाखरु उद्यान फुलविण्यात आले असून पर्यटकांसाठी हे मोठे आकर्षण ठरत आहे. 

दरम्यान औंढा नागनाथ येथील वनपर्यटन येथे विभागीय वन अधिकारी कामाजी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगंधी वन व फुलपाखरु उद्यान फुलविण्यात आले असून पर्यटकांसाठी हे मोठे आकर्षण ठरत आहे. येथे वेगवेगळ्या पद्धतीने वन फुलविण्यात आले असून यात घनदाट वन, बालोद्यान, पॅगोडा राशी, नक्षत्र, औषधी वनस्पती उद्यान तयार करण्यात आले होते. आता वेगवेगळ्या फुलांचे सुगंधी वन व फुलपाखरांसाठी फुलपाखरु उद्यान फुलविण्यात आले असून यात वेगवेगळ्या फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. फुलांनी फुललेली ही रोपे आकर्षण ठरत आहेत.

यामध्ये गुलाब, लिली, रातरानी, दिन का राजा कृष्णकमळ पारिजातक, मेहंदी, केवडा, कपूर तुळस, भीम कपूर, चंदन, रक्तचंदन, मोगरा, चाफा, चंदन, निशिगंधा, जाई- जुई, वेखंड, जरबेरा, जास्वंद आदींसह शंभर ते दीडशे वेगवेगळ्या फुल जातीच्या रोपट्याचा समावेश आहे. या रंगीबेरंगी फुलाच्या रोपट्यांनी सर्वत्र सुंगध दरवळत आहे. मनमोहन अशी विविध वृक्षांची रोपटी पर्यटकांना आकर्षित करित आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या संचारबंदीमुळे मंदिर बंद असल्याने हे उद्यान देखील बंद आहे. 

दरम्यान हे उद्यान फुलविण्यासाठी विभागीय वन परिमंडळ अधिकारी संदीप वाघ, वनरक्षक अमोल झिंनकरवाड, वन मजूर विलास चव्हाण हे पुढाकार घेत आहेत. येथे दररोज देखभाल करुन रोपट्यांना पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: Aundha Forest Department's forest tourism includes fragrant forest, butterfly garden hingoli news