हिंगोलीत दिलासा : एसआरपीएफचे दोन जवान कोरोनामुक्त

राजेश दारव्हेकर
Friday, 8 May 2020

येथील एसआरपीएफच्या दोन जवानांचे १४ व १५ दिवसांनंतर घेतलेले थ्रोट स्वॅब अहवाल शुक्रवारी सायंकाळी निगेटिव्ह आले. त्यामुळे दोन जवान कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन जवानांचा १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी (ता. आठ) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तीन रुग्ण कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे नागरिकांतून डॉक्टरांचे कौतूक केले जात आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील पहिला कोरोनाधित आढळलेल्या रुग्णाचे १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्याला कोरोनामुक्त करण्यात आले. तसेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

हेही वाचावापरलेल्या मास्‍कची ‘डिस्‍पोज मित्रा’ लावणार विल्‍हेवाट

दोन जवान कोरोनामुक्त

दरम्यान, त्यानंतर तब्बल ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यासर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे. शुक्रवारी यातील दोन जवानांचे १४ व १५ दिवसांनंतर घेतलेले थ्रोट स्वॅब अहवाल सायंकाळी निगेटिव्ह आले. त्यामुळे दोन जवान कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

कोरोनाबाधित रुग्णामध्ये परिचारिकेचा समावेश 

 सध्या एसआरपीएफचे ८२ जवानांसह सेनगाव येथील दोन, वसमत येथील एक, जालना एसआपीएफ जवानाच्या संपर्कातील दोन व जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा समावेश आहे. दरम्यान, एसआरपीएफ जवानांपैकी सहा जवानांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

१३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या संपर्कातील १३ जनांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

२७ रुग्णाचे अहवाल प्रलंबित

जिल्हाभरातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये १ हजार ३५३ रुग्ण दाखल झाले आहेत. सध्या ८८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावरउपचार सुरू आहेत. तसेच एक हजार २२९ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यातील संशयित एक हजार ८१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

येथे क्लिक कराशेतकऱ्यांना दिलासा: कृषी सेवा केंद्र दररोज राहणार सुरू

शुक्रवारी २६३ नवीन संशयित रुग्ण दाखल

जिल्ह्यातील सात क्वॉरंटाइन सेंटरमध्ये २६३ नवीन कोरोनासंशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये हिंगोलीतील आयसोलेशन वार्डात ८७, कळमनुरीतील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये १२, सेनगाव १८, एसआरपीएफ क्वारंटाइन सेंटरमध्ये ११०, हिंगोलीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ३६ रुग्ण दाखल झाले आहेत. 

अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका

जिल्ह्यात तब्बल ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news : Two SRPF jawans released Hingoli news