मद्य शौकिनांसाठी खुशखबर; आता परभणीतही मिळणार घरपोच दारू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

कोरोना विषाणू संसर्गानंतर ता. २२ मार्चपासून जिल्ह्यात मद्य विक्री बंद करण्यात आली होती. ती अद्यापही बंदच आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत मद्य शौकिनांचा हिरमोड झाला होता. परंतु, आता जिल्ह्यात मद्य विक्री होणार असली तरी ती ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून करता येणार आहे. 

परभणी : परभणी जिल्ह्यातील मद्य शौकिनांसाठी आनंदाची बातमी आहे. आता परभणी जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने मद्य खरेदी करता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे घरपोच मद्यसेवा पुरविण्‍यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गानंतर ता. २२ मार्चपासून जिल्ह्यात मद्य विक्री बंद करण्यात आली होती. ती अद्यापही बंदच आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत मद्य शौकिनांचा हिरमोड झाला होता. परंतु, आता जिल्ह्यात मद्य विक्री होणार असली तरी ती ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून करता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने (https://forms.gle/sFSw७NrgtYY६२kHMA) ही लिंक देण्यात आली आहे. या प्रणालीत मद्य खरेदी करण्यास इच्छुकांनी स्वत:चे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता भरावयाचा आहे. परवानाधारकांनी परवान्याची फोटो कॉपी आणि परवाना नसेल तर इतर कोणतेही ओळखपत्र अपलोड करावयाचे आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक खरेदी करणाऱ्यांनी आपले स्वत:चे छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. त्याच बरोबर प्रत्येक मागणी नोंदवितांना आपल्या भागातील मद्य विक्रेता निवडावयाचा आहे. मागणी करण्याचा मद्य प्रकार आणि युनिटची संख्या नमूद करणे आवश्यक आहे. मद्य खरेदीची नोंदणी केल्यानंतर मद्य विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या स्टॉकनुसार ऑर्डर पूर्ण होईल. मद्य खरेदीसाठी परवाना असणे आवश्यक आहे. परवाना नसेल तर खरेदीपूर्वी मद्य विक्रेत्याकडून एकदिवसीय मद्यसेवन परवाना उप्लब्ध करून घ्यावा. सदर मागणी ता. १७ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्‍यापुर्वी तपासा- वनामकृविचा सल्ला
 

घरपोच हवे आहे मद्य?
विदेशी मदयाबाबतीत घरपोच सेवा आवश्‍यक असल्‍यास तसे नमूद करावे. घरपोच मद्यसेवा फक्‍त विदेशी मद्य पुरविण्‍यात येईल. मद्य खरेदीची मागणी संकलित झाल्यानंतर अर्जांची छाननी करून परभणी जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांच्या नावानुसार वर्गवारी करण्यात येईल आणि ज्या क्रमाने अर्ज केले आहेत त्या क्रमाने वेळापत्रक आखून देण्यात येईल. संबंधित खरेदीदारास त्यांनी नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांना नेमून दिलेला दिनांक कळविण्यात येईल.
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for wine lovers; Now you will also get home-made liquor in Parbhani