लातुर येथे बंद शांततेत , दुपारनंतर दुकाने सुरु

हरि तुगावकर
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आवाहनाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गंजगोलाई, हनुमान चौक, भुसार लाईन, सुभाष चौक, मिनी मार्केट, शिवाजी चौक, नंदी स्थानक आदी भागात सकाळपासूनच दुकाने बंद राहिली.

लातूर ः केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शुक्रवारी (ता.24) लातूर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दुपारपर्यंत अनेक भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दुपारनंतर मात्र हळूहळू दुकाने सुरु झाली. दुपारपर्यत हा बंद शांततेत होता.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आवाहनाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गंजगोलाई, हनुमान चौक, भुसार लाईन, सुभाष चौक, मिनी मार्केट, शिवाजी चौक, नंदी स्थानक आदी भागात सकाळपासूनच दुकाने बंद राहिली. सकाळी काही कार्यकर्ते दुकाने बंद करण्यासाठी रस्त्यावर आले होते. त्यामुळे लहान लहान टपऱ्यांसह मोठी दुकानेही बंद राहिली. शहरात चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत होता.  

हेही वाचा-पाथरीतील साई संस्थांन विश्वस्तांचा  खंडपीठमध्ये जाण्याचा निर्णय

उदगीर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद
केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्याचा निर्णय त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी (ता.24) आयोजित बंदला उदगीरात दुपारपर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला.
संवेदनशील उदगीर शहरात सकाळपासूनच नेहमीप्रमाणे शाळा-महाविद्यालयांना सुरवात झाली. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली. शहरातील नांदेड-बिदर या मुख्य रस्त्यावरील काही दुकाने वगळता बसस्थानकाच्या समोरचा परिसर, भोसले कॉम्प्लेक्‍स, देगलूर रस्ता परिसर, मोंढा रस्ता, डॅम रस्ता आदी भागातील अनेक दुकाने उघडी होती.

यावरही क्लिक कराकाय आहे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ... मनसेने झेंडयात वापरावी का...

औसा येथे कडकडीत बंद
औसा : नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्या विरोधात शुक्रवारी औसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून सकाळपासूनच औषधी दुकाने, बॅंका व दवाखाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थीच नसल्याने या ठिकाणीही अघोषित बंदच दिसून येत आहे.
वंचित आघाडी व अन्य संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा चांगला परिणाम औसा शहरात शुक्रवारी दिसून आला. गुरुवारी दुपारपासूनच शहरातील व्यापाऱ्यांना ध्वनिक्षेपकावरून शुक्रवारच्या बंदची माहिती दिली जात होती. सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंदच ठेवली होती.

सकाळी अकरा वाजता शहरातून एक आवाहन फेरी काढण्यात आली. यामध्ये जी प्रतिष्ठाने सुरू होती ती बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारी शुक्रवारच्या नमाजनंतर येथील नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानावर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोक एकत्र येणार असल्याचे समजते. या ठिकाणी शाहीन बागच्या धर्तीवर साखळी पद्धतीने आंदोलन करण्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही समजत आहे. या बंद दरम्यान कुठेही अनुचित आणि अप्रिय घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. भादा आणि किल्लारी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उजनी, किल्लारी आदी भागात पोलीस गस्ती वाढवण्यात अली आहे. अद्यापपर्यंत बंद शांततेत सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good Response To Bandh Latur City