गोपीनाथराव मुंडे : कायम संघर्ष वाट्याला आलेले लोकनेते 

दत्ता देशमुख
Wednesday, 3 June 2020

कुठलाही राजकीय वारसा नसताना आयुष्यात सुरुवातीपासून संघर्ष करणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना शेवटपर्यंत संघर्षच करावा लागला. मात्र, दांडगा जनसंपर्क, संवाद यामुळे लोकनेत्याला जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री अशी झेप घेता आली. युनोमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 

बीड : कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ दांडगा जनसंपर्क, कायम संघर्षाची तयारी, संवाद याच्या बळावर विविध पदांना गवसणी घालतानाच लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात गोपीनाथराव मुंडे यशस्वी झाले. परंतु, संघर्षातून सुरुवात करणाऱ्या या लोकनेत्याला आयुष्याच्या शेवटर्पंत संघर्षच वाट्याला आला. त्यांनी अनेकांना नेते केले म्हणूनच तेही लोकनेते झाले. संवाद आणि संघर्षामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्यावर जात, धर्म, पंथ व पक्ष या पलिकडे जाऊन लोकांनी प्रेम केले आणि त्यांनीही. विशेष म्हणजे सामान्यांनी त्यांच्याकडू प्रेमापेक्षा काही अपेक्षाही ठेवल्या नाहीत.

दिवंगत मुंडेंच्या कुटूंबात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि त्यात त्यांनी निवडलेला भाजप त्यावेळी कुचेष्टेचाच विषय होता. मात्र, प्रवाहाच्या विरुद्ध जात  भाजपलाही बहुजनांचा पक्ष अशी प्रतिमा करण्यात खरा वाटा गोपीनाथरावांचाच. सुरुवातीला दिवंगत प्रमोद महाजन यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणाऱ्या दिवंगत मुंडे यांना पुढे महाजन यांचीही खंबीर साथ मिळाली.

सुरुवातीच्या काळात त्यांनाही पराभवाचे तोंड पहावे लागले. परंतु, त्यांनी संघर्ष आणि संपर्क ढळू दिला नाही. नावारुपाला आलेला पक्ष नाही, कार्यकर्त्यांची दांडगी फळी नाही, लढण्यासाठी सर्व संसाधणे नाहीत पण जिद्द आणि संघर्ष मात्र मुंडेंकडे होता. दरम्यान, १९७८ ची जिल्हापरिदेची निवडणूक लागली. दिवंगत बाबूराव आडसकर यांची अंबाजोगाई, रेणापूर, केज या भागावर राजकीय हुकूमत होती.

रेणापूरचे तत्कालीन आमदार रघुनाथराव मुंडे यांच्यावरही दिवंगत आडसकरांचाच प्रभाव होता. गोविंदराव कराड चिखलीकर त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र आडसकर त्यांच्यावर नाराज होते. मात्र काँग्रेसची उमेदवारी गोविंदरावाना मिळणार हे निश्र्चित होते. त्यांच्याशी टक्कर घेऊ शकेल अशा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा शोध सुरू झाला आणि तो गोपीनाथराव मुंडे यांच्या नावावर थांबला. गोपीनाथराव विरुध्द गोविंदराव असा सामना रंगला. त्यावेळी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्यावर गोपीनाथरावांनी बाजी मारली. तेव्हापासून जादूची कांडी हे विशेषणही त्यांच्या नावासमोर जोडले गेले.

पुढे, १९७८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना रेणापूर मतदार संघातून काँग्रेसचे दिवंगत रघूनाथराव मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, १९८० च्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून एस. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली. जिल्ह्यातील काँग्रेसच्या सातही जागा पडल्या. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे भाजपकडून विजयी झाले आणि त्यांनी विधीमंडळाची पायरी प्रथम शिवली. ही विधानसभा कार्यकाळ पूर्ण करू शकली नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त केले. त्यामुळे विधानसभा बरखास्त झाली. १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंडितराव दौंड यांनी गोपीनाथरावांचा पराभव केला. त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात दोन वेळा विधानसभेला पराभवाचे तोंड पाहीले. मात्र, खचले नाहीत आणि संघर्षही थांबवला नाही.

मात्र, या पराभवानंतर दिवंगत मुंडे यांच्या खांद्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आली. या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र पिंजून काढला‌ आणि भारतीय जनता पक्षाला‌ बहुजनांचा टँकर्स म्हणून मान्यता मिळवून दिली. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात पक्ष रुजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला. दरम्यान, १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे पुन्हा आमदार झाले. या आमदारकीतही त्यांच्या यशात काँग्रेसचे योगदान होतेच. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांची निखळ मैत्री होती. दोघेही परस्परांना मदत करीत असत. रेणापूरसह काही जिल्हापरिषद सर्कल लातूर जिल्ह्यात समाविष्ट झाले. त्यामुळे विलासरावांची मदत मोलाची ठरे.

विधानसभेत गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे गटनेते होते. त्याचवर्षी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. युतीच्या शिल्पकारांमध्ये गोपीनाथराव मुंडेही होते. विधानसभेत विरोधीपक्षनेते पद शिवसेनेकडे गेले मनोहर जोशी यांना हा सन्मान मिळाला. परंतु दोन वर्षांतच शिवसेनेत फूट पडली. छगन भुजबळांनी बारा आमदारांसह बंड पुकारले. 
छगन भुजबळांचे बंड गोपीनाथराव मुंडेंच्या पथ्यावर पडले. बारा आमदार गेल्यामुळे शिवसेनेचे सभागृहातील संख्याबळ घटले. त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते.

गोपीनाथरावांना विरोधीपक्षनेतेपद मिळण्यात दिवंगत नाईकांसह दिवंगत विलासराव देशमुख यांचेही योगदान महत्वाचे ठरले. विरोधीपक्षनेते पद मिळताच दिवंगत मुंडेंच्या नेतृत्व आणि वक्तृत्वाला नवी झळाळी मिळाली. त्यातच १९९३ साली मुंबई बाँम्बस्फोटाने हादरली. गोपीनाथराव मुंडे मुंबईत फिरले आणि सामान्यांना आधार दिला. मुंबईची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुधाकरराव नाईक हतबल ठरल्याचे कारण देऊन शरद पवार यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आले. पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर गोपीनाथराव मुंडेंची आक्रमकता अधिकच वाढली. विविध प्रश्नांवर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले. विरोधी पक्षनेता काय असतो हे महाराष्ट्राला त्यांच्यामुळेच माहित झाले.

पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता झाल्यावर मुंडे यांनी अनेक यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत यश आले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यामुळे सत्तास्थापनेचा मारली मोकळा झाला. काही अपक्ष आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात दिवंगत मुंडे उपमुख्यमंत्री झाले. गृहखात्यास ऊर्जा आणि इतर महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आली. सत्तेचा वापर जनतेच्या विकासाकरिता झाला पाहिजे हा त्यांचा कायम आग्रह असे. दऱ्या खोऱ्यातील ऊसतोडणी कामगारांमुळे त्यांना यश मिळाले. त्या वर्गालाही त्यांनी उर्जा आणि सन्मान मिळवून दिला.

दरम्यान, केंद्रात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली परंतु तेरा दिवसांत सरकार कोसळले. परंतु या अल्पकालीन सरकारकडून त्यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यांची परवानगी मिळविली आणि वर्षभरात हा कारखाना उभारला. विरोधकांनाही मदत करण्यात ते आघाडीवर होते. त्यांच्या काळात नवीन साखर कारखान्यांना मदत करण्याचा निर्णय झाला. अनेक कारखान्यांना मदत झाली.

निवडणुकीपुरते राजकारण आणि त्यानंतर समाजकारण असे दिवंगत मुंडे यांचे धोरण असे. विशेषत: सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी पक्षानिभिवेश बाळगला नाही. सहकारी संस्थांमध्ये सर्वांना सहभागी करून या संस्थांची निवडणूक बिनविरोध कशी होऊ शकेल असा त्यांचा प्रयत्न असे. राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे होती परंतु बीड जिल्ह्यातील एकही संस्था या पक्षाकडे नव्हत्या. मात्र अत्यंत खुबीने जिल्ह्यातील सर्व संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या. अनेक काँग्रेसजनांचे पुनर्वसन त्यांनी केले.

विरोधकांना आपल्या पक्षातून संधी देऊन पक्षविस्ताराची अफलातून कल्पना त्यांनी राबविली. दरम्यान, दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी विधानसभेच्या पाच आणि लोकसभेच्या तीन निवडणुका जिंकल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांना कष्टच घ्यावे लागले. परंतु जादूची कांडी नेहमीच कामाला आली. विरोधकांना हाताशी धरून त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार पराभूत करायचा ही कला त्यांना साध्य झाली होती. भारतीय जनता पक्षाला मुस्लिम समाजाची मते मिळत नाहीत ही वस्तुस्थिती परंतु गोपीनाथराव मुंडे यांना प्रत्येक निवडणुकीत ही मते मिळाली. गोपीनाथरावांच्या बाबतीत मतदार पक्षाचा नव्हेतर व्यक्ती म्हणून मतदान देत असत.

त्यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांच्या बैठकीत आलेल्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते घरी जात नसत.या भेटीसाठी त्यांना वेळेचेही बंधन नसे. काहीही काम नसताना केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक येत. गोपीनाथराव आणि उशीर हे सूत्र ठरलेलेच असे. कोणत्याही कार्यक्रमाला ते वेळेवर आले असे कधी घडलेच नाही. प्रवासात लोक त्यांना ठीकठिकाणी थांबवायचे त्यामुळे कार्यक्रमाला उशीर होत असे. दरम्यान, त्यांनी केंद्रातही लोकलेखा समितीचे उपाध्यक्षपद, भाजपचे केंद्रीय उपाध्यक्ष व सरचिटणीसपदावरही काम केले. युनोत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सव्वालाखाहून अधिक मताधिक्याने गोपीनाथराव मुंडे विजयी झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत गोपीनाथरावांचा समावेश असेल ही अपेक्षा फोल ठरली. त्यांना संघर्षाशिवाय काहीच मिळाले नाही. मंत्रिपदासाठी तीन दिवस संघर्ष करावा लागला. ग्रामविकासमंत्री म्हणून शपथविधी झाला. जिल्ह्यातील जनतेच्या आनंदला उधाण आले. सर्वांच्या त्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्याला केंद्रात स्थान मिळाले.

शपथविधी झाला आणि मुंडेसाहेब त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भगवानगडावर आले. एक जूनचा तो दिवस. दर्शन आटोपून दिवंगत मुंडे आणि देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांच्या समवेत जामखेड तालुक्यातील चोंडी येथे गेले. दोन तारीख गेली आणि तीन जूनला सकाळीच मुंडे साहेबांच्या अपघाताची बातमी आली. या बातमीने आनंदात असलेल्या लोकांचे भान हरपले. आपला व्यक्ती गेला हे त्या तीन जुनला आणि आजही लोकांना खरे वाटत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopinath Munde Political Struggle