esakal | सत्तार यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुल सत्तार

आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार
यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला तालुक्‍यात पुन्हा एकदा उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक श्री. सत्तार व समर्थकांच्या वतीने शनिवारी (ता.24) शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात
आल्यामुळे शहरासह तालुक्‍यात सत्तारांच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

सत्तार यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार
यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला तालुक्‍यात पुन्हा एकदा उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक श्री. सत्तार व समर्थकांच्या वतीने शनिवारी (ता.24) शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात
आल्यामुळे शहरासह तालुक्‍यात सत्तारांच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.


लोकसभेच्या निवडणुकीपासून सत्तार कॉंग्रेस पक्षापासून दुरावले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात जाऊन प्रचार केला. दरम्यान, श्री. फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता. मधल्या काळात स्थानिक पातळीवरील भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध करीत त्यांचा पक्षप्रवेश न करण्यासाठी पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांना साकडे घातले होते. श्री. सत्तार यांनी याकडे काणाडोळा करीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या होत्या.

त्यांच्या कन्येच्या लग्नसमारंभानिमित्ता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर यांनी सत्तारांच्या पक्षप्रवेशावर जुगलबंदी करीत यावेळी भाषणे ठोकली होती. भाजप पक्षप्रवेशासाठी विरोध होत असताना श्री. सत्तारांनी "मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चाही रंगली; परंतु उद्धव ठाकरेंची भेटही पक्षप्रवेशासाठी नसल्याचा खुलासा सत्तारांनी केला होता. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्तारांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांच्या समर्थक मतदारांसह अंबादास दानवेंच्या विजयात मोठा वाटा उचलला. महाजनादेश यात्रेच्या मराठवाड्यातील दौऱ्यात बुधवारी सिल्लोड येथे स्वागत सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांत अगोदर आमदार अब्दुल सत्तार यांनीच शहरातील चौकांत महाजनादेश यात्रेचे स्वागत फलक झळकावल्यामुळे परत एकदा पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली.


मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मैत्रीचे संबंध असून, त्यांचे स्वागत करणे माझे कर्तव्य आहे. तालुक्‍यातील तळागाळातील कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. मोठ्या संख्येने शहरातील प्रियदर्शिनी चौकामध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
अब्दुल सत्तार, आमदार

loading image
go to top