Latur | वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध; राज्यमंत्री संजय बनसोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Bansode
वारकऱयाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबध्द

वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध; राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर - ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमित वारकरी संप्रदाय निर्माण झाला आहे. हा वारकरी संप्रदाय भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाज मनाचे प्रबोधन करीत आहे. वारकरी मंडळीचे काही प्रश्न आहेत, ते शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. येथे वारकरी साहित्य परिषदेच्या गुरुवारी झालेल्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल वारकरी पुरस्काराचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माधव महाराज शिवणीकर, गुरुवर्य गुरुबाबा औसेकर महाराज, महापौर विक्रांत गोजमगुंडे, धनराज पारीक धामणगावकर, लक्ष्मीछाया बडके, सुनंदा भडक, मुक्लाबाई देवे, अहिल्याबाई शिंदे, मधुबाला एजगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ST Strike : उदगीर आगारातील एसटीचे नऊ कर्मचारी निलंबित,आंदोलन सुरुच

‘महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम महाराज या संतांचा मोठा प्रभाव मराठी मनावर सातत्याने टिकून आहे. कोणत्याही काळात या परंपरेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला आणि तुकोबांनी कळस रचला, अशी मांडणी केली जाते आहे. ही परंपरा आणि संत विचाराचा एक समान धागा सर्वांमध्ये आहे. या भक्ती चळवळीतून समाजमनाचे प्रबोधन करण्याचे मोठे काम आजपर्यंत झाले आहे. समाजात जात-धर्म यांच्यात वाढलेला तणाव संपवण्याचे काम हे केवळ ही संत परंपराच करू शकते. समाजाची अस्थिरता संपविण्याचे कामही संत विचाराच्या प्रबोधनातून शक्य आहे’, असेही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात अजून तरी कथन आणि श्रवण संस्कृती टिकून आहे. त्याला संत विचारांचे एकात्म दर्शन कारणीभूत असून, या चळवळीच्या माध्यमातून संतुलित, सकस विचार तरुणांपर्यंत पोचेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

loading image
go to top