कार्यालयांत शुकशुकाट अन्‌ रुग्णसेवेवरही परिणाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. संप तीन दिवस चालणार असल्याने ही परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद, आरोग्य, महसूलसह विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता.

औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. संप तीन दिवस चालणार असल्याने ही परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद, आरोग्य, महसूलसह विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता.

जिल्हा परिषदेत शुकशुकाट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीनदिवसीय संपात जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झाले, मात्र त्यांनी फक्‍त एक दिवसाचाच संप केला. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे मंडप टाकून कर्मचारी दिवसभर बसून होते, यामुळे सर्वच विभागांमध्ये अधिकाऱ्यांच्या दालनाशिवाय सर्वत्र शुकशुकाट होता. मुख्यालयातील साडेसहाशे, तर जिल्हाभरातील दीड हजारावर लिपिक, लेखा, परिचर, वाहनचालक, आरोग्य कर्मचारी, पशुसंवर्धन कर्मचारी सहभागी झाले होते. लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वैजनाथ गमे, किरण सरोते, सुभाष वैद्य, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी. एफ. बैनाडे, राज्य कार्यकारिणी अध्यक्ष प्रमिला कुंभारे, दीपक दांडगे, कृष्णा चव्हाण, बाबासाहेब काळे,  प्रदीप राठोड आदींची उपस्थिती होती.

घाटीतील रुग्णसेवेवर परिणाम
संपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथील परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले. संपाचा अंशत: फटका रुग्णसेवेवर बसला. परंतु, यावर तत्काळ उपाय म्हणून वॉर्डातील रुग्णांवरील उपचारासाठी शिकाऊ परिचारिकांना पाचारण करण्यात आल्याने रुग्णसेवा पूर्ववत झाली. परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी सकाळी आठपासून संप पुकारला. तत्पूर्वी परिचारिका महाविद्यालयाच्या फाटकाजवळ एक बैठकही पार पडली. सफाई कामगारांनी वैद्यकीय अधीक्षक भारत सोनवणे यांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा शुभमंगल भक्त, सचिव इंदुमती थोरात, कुंदा पानसरे, द्रोपदी कर्डिले, कालिंदी इधाते, मीना राठोड, हेमलता शुक्‍ला, महेंद्र सावळे, मकरंद उदयकार, प्रवीण व्यवहारे आदी सहभागी होते.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दहा कर्मचारी संपावर
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील ११ पैकी दहा कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. यामुळे कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम दिसून आला. या कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे कार्यालयातर्फे सांगण्यात आले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात केवळ जिल्हा उपनिबंधक आणि त्यांचे दोन सहायक आणि तीन शिपाई एवढेच  कर्मचारी मंगळवारी (ता. सात) हजर होते. 

जीएसटीतील १८६ कर्मचारी संपावर 
संपात वस्तू व सेवाकर (जीएसटी)च्या औरंगाबाद, बीड, जालना येथील १८६ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या संपात सहभागी होणाऱ्यांवर आता कार्यालयातर्फे शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी सहा ऑगस्टपर्यंत असहकार आंदोलन केले. त्यानंतर राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपात पुन्हा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. या संपात सहभागी न होण्यासाठी जीएसटी कार्यालयातर्फे कर्मचाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला. संपावर गेलेल्यांना काम नाही तर वेतन नाही, हे केंद्राचे धोरण अवलंबत कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबाद जीएसटी कार्यालयात एकूण २२० अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यापैकी १४४ कर्मचारी संपात सहभागी झाले, तर ५८ अधिकारी कामावर हजर होते. जालना येथे ४४ आणि बीड येथे ३० अधिकारी कार्यरत आहेत. या दोन्ही ठिकाणचे १९ अधिकाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला.

ऑनलाइनने लायसनला तारले 
आरटीओ कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याने कामकाजावर परिणाम झाला; मात्र ऑनलाइन प्रणालीमुळे परवाना विभागाचे सर्व कामकाज सुरळीत झाले. आरटीओ कार्यालयातील लिपिकवर्गीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सर्वच खिडक्‍या बंद असल्याने शुकशुकाट दिसत होता. असे असले तरीही शिकाऊ परवाना आणि पक्का परवाना काढण्यासाठीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. नेहमीप्रमाणे १४० शिकाऊ परवाने आणि १२० पक्के परवाने देण्यात आल्याचे सहायक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी सांगितले. द्वारसभेला श्री. सोमवंशी, विश्‍वा राऊत, तुषार बावस्कर, अनिल मगरे, श्री. त्रिभुवन, प्रवीण काकडे, श्री. आहेर, श्री. बिघोत यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt employees on strike