हरभरा खरेदीची मुदत संपत आल्यामुळे खरेदी केंद्रवार गर्दी

निळकंठ कांबळे
बुधवार, 13 जून 2018

लोहारा (जि. उस्मानाबाद) : नाफेडकडून खरेदी करण्यात येत असलेल्या हरभरा खरेदीची अंतिम मुदत संपत येत असल्याने बुधवारी (ता. १३) येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. हरभरा घेऊन आलेल्या वाहनांची खरेदी केंद्रासमोर मोठी रांग लागली आहे.  मुदतवाढीनंतरही बारदान्याअभावी हरभरा खरेदी करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे तब्बल दोन हजार शेतकऱ्यांचा जवळपास १५ हजार क्विंटल हरभरा शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाजार समितीच्या आवारात गेल्या चार महिन्यांपासून आधारभूत हरभरा खरेदी केंद्र सुरू आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच बारदाना तुटवड्याचे कारण पुढे करून काही दिवस हरभरा खरेदी बंद पडली होती. त्यातच मुदत संपल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा हरभरा शिल्लक राहिला. हरभरा खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जोर धरल्याने १३ जूनपर्यंत मुदत वाढवून दिली. परंतु मुदत वाढवून दिल्यानंतरही बारदान्याअभावी खरेदी बंद होती. बारदाना उपलब्ध होताच सोमवारपासून (ता. ११) हरभरा खरेदीला सुरवात करण्यात आली. अवघ्या दोन दिवसांत ११२ शेतकऱ्यांचे एक हजार ७७८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. हरभरा विक्रीसाठी या केंद्रावर चार हजार ८७९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

त्यापैकी आतापर्यंत दोन हजार ४९५ शेतकऱ्यांचा  एकूण ३७ हजार ४४६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. बुधवारी खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने आधारभूत हरभरा केंद्रावर धान्याची मोठी आवक वाढली असून, केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र पूर्ण हरभरा खरेदी होऊ शकणार नसल्याने जवळपास १५ हजार क्विंटल हरभरा शिल्लक राहणार आहे. चार महिन्यांत चार हजार ८७९ पैकी फक्त दोन हजार ४९५ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाला. उर्वरित दोन हजार ३८४ शेतकऱ्यांचा हरभरा एकाच दिवसांत कसा खरेदी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

Web Title: gramme farmers crowded due to the end of the purchase period