तर ‘थेट’ सरपंचांना दोन मतांचा अधिकार! सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकानंतर आता थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना एक नव्हे तर दोन मतांचा अधिकार असल्याचा उलगडा झाला आहे.

Grampanchyat Deputy Sarpanch : तर ‘थेट’ सरपंचांना दोन मतांचा अधिकार! सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता

लातूर - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकानंतर आता थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना एक नव्हे तर दोन मतांचा अधिकार असल्याचा उलगडा झाला आहे. या अधिकारामुळे काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचांच्या निवड प्रक्रियेत चमत्कार घडून सत्तेची समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यातील ही तरतूद जुनीच असली तरी त्याचे स्पष्टीकरण देणारे, ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुनील माळी यांचे एक पत्र समाजमाध्यमांवर सध्या व्हायरल होत आहे. त्यानुसार उपसरपंचांच्या निवडीत सरपंचांना अन्य सदस्यांसोबत मतदान केल्यानंतर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचाही अधिकार असणार आहे.

पाच वर्षांपूर्वी तत्कालीन युती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. मध्यंतरी आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बासनात गुंडाळत पूर्ववत सदस्यांतून सरपंचांची निवड सुरू केली. अडीच वर्षे या पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर पुन्हा नव्याने आलेल्या सरकारने थेट जनेततून सरपंचांची निवड सुरू केली. राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या सर्व निवडणुका याच पद्धतीने पार पाडल्या. यामुळे आता उपसरपंच निवडीत सरपंचांच्या अधिकाराची चर्चा घडून येत आहे.

याबाबत यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्राला मार्गदर्शन करणारे ग्रामविकास विभागाचे ३० सप्टेंबर २०२२ चे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यानुसार उपसरपंचांच्या निवडीत सरपंचांना दोन मतांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले असून दुसऱ्या मताचा अधिकार हा उपसरपंच निवडीत उमेदवाराला समान मते पडल्यानंतर निर्णायक मत देण्याबाबतचा आहे. यामुळे जास्त सदस्य निवडून येऊनही काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतींत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांची चलती असेल.

नेमके काय होणार?

एखाद्या सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींत पहिल्या पॅनलचे चार व दुसऱ्या पॅनेलचे तीन सदस्य आणि सरपंच निवडून आला असेल तर चार सदस्य असूनही सरपंचांना असलेल्या दोन मतांच्या अधिकारामुळे दुसऱ्या पॅनलचा सदस्य उपसरपंचपदी निवडून येणार आहे. यात दोन्ही पॅनलमधून उपसरपंचपदासाठी उभारलेल्या सदस्यांना पहिल्या फेरीतील सरपंचांच्या मताच्या अधिकारामुळे समान मते पडणार व त्यानंतर सरपंच आपल्या पॅनलच्या सदस्याला निर्णायक मत देऊन उपसरपंचपदी निवडून आणेल. अशा काठावरील ग्रामपंचायतींमध्ये हा दोन मतांचा चमत्कार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हटलेय पत्रात?

  • उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंचांना मतदानाचा अधिकार असेल. या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

  • उपसरपंचांची निवडणूक ही सरपंचांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंचांची निवड करणे कायद्याने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंचांच्या कर्तव्याचा भाग आहे.

  • उपसरपंच निवडणुकीची सभा तहकूब झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार ती सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घ्यावी.

  • उपसरपंचाच्या निवडणुकीत अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी खातरजमा करून तातडीने पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.