esakal | ग्राऊंड रिपोर्ट: अतिवृष्टीच्या पुरात ‘हिरवं स्वप्न’ही गेलं वाहून । Marathwada
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राऊंड रिपोर्ट: अतिवृष्टीच्या पुरात ‘हिरवं स्वप्न’ही गेलं वाहून

ग्राऊंड रिपोर्ट: अतिवृष्टीच्या पुरात ‘हिरवं स्वप्न’ही गेलं वाहून

sakal_logo
By
पांडुरंग उगले

माजलगाव: वीस दिवसांत दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे बहरात आलेल्या सोयाबीनच्या शेंगा काळवंडल्या तर, अनेक ठिकाणी उभ्या झाडाच्या शेंगालाच कोंब फुटले आहेत. सततच्या पावसामुळे वाढ खुंटलेल्या कपाशीचे बोंडेही खराब झाली आहेत. यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास वाया गेला आहे. एकूणच अतिवृष्टीच्या पुरात शेतकऱ्यांचे हिरवं स्वप्नच वाहून गेल्याने वर्षभर संसाराचा गाडा ओढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.

मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने यंदा खरिपाची पेरणी वेळेवर झाली होती. गतवर्षी सोयाबीनला विक्रमी १० हजारांचा भाव मिळाल्याने यंदा सोयाबीनची पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. पेरणीनंतर आवश्यक तेवढाच पाऊस पडत राहिल्याने सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद यासारखी पिके जोमात आली होती.

हेही वाचा: शेतकऱ्यांनी दिलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना देणार भेट : फडणवीस

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून सुरु झालेला पाऊस सातत्याने पडत राहिल्याने जमिनीत वाफसा न झाल्याने शेतकऱ्यांना पिकांची मशागत करता आली नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून वीस दिवसांत दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले. तर, नदी, नाले, ओढ्याला आलेल्या पुरात शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. महिनाभरापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या काड्या राहिल्या असून, शेंगांना कोंब फुटले आहेत. कापसाची बोंडेही खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीपच हातचा गेल्याने वर्षभर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

loading image
go to top